• ८ जणांवर गुन्हा दाखल ; मठाच्या गेटवरून वाद वाढला

हुक्केरी : बेळगाव जिल्ह्यातील हुक्केरी तालुक्यातील यमकनमर्डी गावातील हुणसीकोळ मठाचे श्री सिद्धबसव स्वामीजी यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी आठ जणांविरुद्ध यमकनमर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मठाच्या शेजारी राहणाऱ्या मेदार कुटुंबाने मठाच्या आवारात कार पार्क केली होती. रात्री कार बाहेर काढताना मठाचे प्रवेशद्वार उघडण्याच्या कारणावरून मठातील कर्मचाऱ्यांशी त्यांचा वाद झाला.

वाद वाढल्यानंतर श्री सिद्धबसव स्वामीजी घटनास्थळी आले असता त्यांच्याशीही हुज्जत घालण्यात आली आणि त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

या प्रकरणी आनंद मेदार, रत्ना मेदार, मंजुनाथ, प्रवीण मेदार यांच्यासह अन्य चार जणांविरुद्ध यमकनमर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.