• स्थवनिधी घाटातील घटना ; ब्रेक निकामी झालेल्या ट्रकची कारला धडक

निपाणी : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४८ वरील स्थवनिधी घाट परिसरात मंगळवारी सकाळी भीषण अपघात झाला. ब्रेक निकामी झालेल्या ट्रकने समोरून येणाऱ्या कारला जोरदार धडक दिल्याने कारचा अक्षरशः चुराडा झाला. या भीषण अपघातात कारमधील दोघांचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य दोघे गंभीर जखमी झाले. या घटनेमुळे काही काळ महामार्गावरील वाहतुकीवर परिणाम झाला.

मृतांची ओळख कोल्हापूर येथील सोयल मुनेर (वय ३६) आणि इचलकरंजी येथील विनय पाटील अशी झाली आहे. अपघातातील दोन जखमींना तातडीने रुग्णवाहिकेद्वारे जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.

पोलीसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, स्थवनिधी घाट उतरत असताना ट्रकचे ब्रेक निकामी झाल्याने चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यानंतर ट्रकने समोरून येणाऱ्या कारला जोरदार धडक दिली. धडकेची तीव्रता इतकी भीषण होती की कार पूर्णपणे चेंगरली गेली आणि कारमधील दोघांचा जागीच मृत्यू झाला.

अपघाताची माहिती मिळताच निपाणी पोलीस, महामार्ग सुरक्षा पथक आणि स्थानिक नागरिक घटनास्थळी दाखल झाले. बचावकार्य करून जखमींना बाहेर काढण्यात आले आणि तातडीने उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले आहेत.

अपघातामुळे राष्ट्रीय महामार्गावर काही काळ वाहतुकीची कोंडी निर्माण झाली होती. पोलिसांनी वाहने पर्यायी मार्गाने वळवून वाहतूक सुरळीत केली. त्यानंतर क्रेनच्या साहाय्याने अपघातग्रस्त वाहने हटविण्यात आल्यानंतर महामार्गावरील वाहतूक पूर्ववत सुरू करण्यात आली.

या प्रकरणी निपाणी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून अपघाताचे नेमके कारण आणि इतर बाबींचा पुढील तपास सुरू आहे.