• विद्यार्थ्यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे आगळीवेगळी मागणी
  • मोकाट कुत्र्यांच्या समस्येकडे वेधले लक्ष

बेळगाव : शहरातील शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयाला भेट देऊन क्रिकेटपटू एम. एस. धोनी यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त बेळगावला आमंत्रित करण्याची आगळीवेगळी मागणी केली. याचवेळी विद्यार्थ्यांनी शहरातील वाढत्या मोकाट कुत्र्यांच्या समस्येकडेही जिल्हाधिकाऱ्यांचे लक्ष वेधले.

विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांची भेट घेऊन धोनीला बेळगावला आमंत्रित करण्यासाठी प्रशासनाने प्रयत्न करावेत, अशी विनंती केली. तसेच गेल्या काही दिवसांपासून संभाव्य पूरस्थिती आणि आपत्ती व्यवस्थापनासाठी जिल्हा प्रशासनाने केलेल्या कामाचे कौतुक करत जिल्हाधिकाऱ्यांचा आंब्याचे रोपटे देऊन सत्कार केला.

यावेळी विद्यार्थ्यांनी शहरात वाढत चाललेल्या मोकाट कुत्र्यांच्या समस्येमुळे नागरिकांना, विशेषतः विद्यार्थ्यांना होत असलेल्या त्रासाची माहिती देत या प्रश्नावर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली.

जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी प्रशासनाकडून मोकाट कुत्र्यांचा उपद्रव कमी करण्यासाठी सुरू असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. तसेच या विषयावरील पुढील अधिकृत बैठकीस विद्यार्थ्यांनाही सहभागी होण्याचे निमंत्रण दिले. एम. एस. धोनी यांना बेळगावला आणण्यासाठी आपल्या परीने प्रयत्न करू, असे आश्वासनही त्यांनी विद्यार्थ्यांना दिले.

या शिष्टमंडळाचे नेतृत्व देविका खानमुखर यांनी केले. यावेळी शिवतेज खन्नुकर, अहिल्या होसुरकर, अर्जुन होसुरकर, सार्थक सैनेकर, वैभवी सैनेकर, शांतनु खन्नुकर, शर्वरी खन्नुकर, अथर्व संतोष पवार, अदिती साळुंके, अनन्या साळुंके, स्वराज खन्नुकर, रुदिता पवार, स्वयंम पवार यांच्यासह अनेक विद्यार्थी उपस्थित होते. विद्यार्थ्यांच्या सामाजिक जाणीवा आणि प्रशासनाशी थेट संवाद साधण्याच्या पुढाकाराचे जिल्हाधिकाऱ्यांनी कौतुक केले.