- पर्यटकांना प्रवेशबंदी ; नदीकाठी व धबधब्यांमध्ये जाण्यास सक्त मनाई
- रील्स आणि धोकादायक स्टंट टाळण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन
बेळगाव : जिल्ह्यात खानापूरसह विविध भागांत झालेल्या मुसळधार पावसामुळे प्रमुख धबधब्यांकडे जाणारे जंगलमार्ग तात्पुरते बंद करण्यात आले असून पर्यटकांना तेथे जाण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. नद्यांमधील पाण्याचा प्रवाह वेगाने वाढत असल्याने नदीकाठी जाणे, धबधब्यांमध्ये रील्स चित्रीकरण करणे अथवा धोकादायक प्रकार टाळावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी केले.
गेल्या २४ ते ४८ तासांत अथणी, चिक्कोडी, हुक्केरी, रायबाग, सौंदत्ती, कित्तूर, निपाणी आणि कागवाड तालुक्यांत २०० ते ४०० मिमी पावसाची नोंद झाली असून, अनेक ठिकाणी नुकसान झाले आहे. खबरदारीचा उपाय म्हणून सिम्बॉल, पारवाड, वज्रपोह आणि डेल्टा धबधब्याकडे जाणारे जंगलमार्ग बंद करण्यात आले असून पर्यटकांच्या प्रवेशावर निर्बंध घालण्यात आले आहेत.
महाराष्ट्रातील पावसामुळे कृष्णा, दूधगंगा, वेदगंगा, घटप्रभा आणि मलप्रभा नद्यांमधील पाण्याचा प्रवाह वाढला असून जिल्ह्यातील सात पुलांवर पाणी आले आहे. या ठिकाणी पोलिसांनी बॅरिकेड्स उभारून वाहतुकीवर निर्बंध लागू केले आहेत. एनडीआरएफ, एसडीआरएफ आणि पोलीस यंत्रणांना हाय अलर्टवर ठेवण्यात आले असून नियंत्रण कक्षही कार्यरत आहे.
दरम्यान, बेळगाव शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या राकसकोप जलाशयातील पाणीसाठ्यात वाढ होत असून सध्या पाण्याची टंचाई भासणार नसल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. मात्र, नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असे आवाहन त्यांनी केले. मुसळधार पावसामुळे जिल्ह्यात पाच मातीची घरे कोसळून नुकसान झाले असून संबंधितांना नुकसानभरपाई देण्याच्या सूचना महसूल विभागाला देण्यात आल्या आहेत.
जिल्ह्यातील प्रमुख धबधब्यांवर सुरक्षित आणि नियंत्रित पर्यटन सुरू करण्यासाठी वन विभागाशी समन्वय साधून पुढील १० ते २० दिवसांत मार्गदर्शक तत्त्वे तयार करण्यात येणार असल्याची माहितीही जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी दिली. तसेच नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करून अनावश्यक धोका टाळावा, असे आवाहन त्यांनी केले.








