- शिवानंद निलण्णावर यांच्या विरुद्ध कागवाड पोलीस ठाण्यात पहिली तक्रार दाखल
बेळगाव : बहुचर्चित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात शिवम असोसिएट्स विरोधात पहिली अधिकृत खाजगी तक्रार नोंदविण्यात आली आहे. कागवाड तालुक्यातील गुंतवणूकदार कृष्णा अप्पण्णा अप्राज यांनी कागवाड पोलीस ठाणे येथे तक्रार दाखल केली आहे.
तक्रारीनुसार, शिवम असोसिएट्सचे मालक शिवानंद निलण्णावर यांनी गुंतवणुकीवर वार्षिक ३६ टक्के व्याज देण्याचे आश्वासन दिले होते. त्यावर विश्वास ठेवून कृष्णा अप्राज यांनी एप्रिल महिन्यात टप्प्याटप्प्याने सुमारे ५ लाख रुपये कंपनीत गुंतवले होते.
मात्र, गुंतवणुकीवरील व्याज न मिळाल्याने तसेच मूळ रक्कमही परत न दिल्याने आपली फसवणूक झाल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
दरम्यान, कोट्यवधी रुपयांच्या या कथित आर्थिक घोटाळ्याचा तपास सीआयडी कडे सोपविण्याची प्रक्रिया सुरू असून, या प्रकरणातील पहिला एफआयआर कागवाड पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आला आहे. पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे.








