- आरोग्य आणि क्रीडा क्षेत्रातील युगपुरुष हरपला
कोल्हापूर : शिक्षण, आरोग्य आणि क्रीडा क्षेत्रात भरीव योगदान देणारे ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ, समाजसेवक आणि माजी राज्यपाल पद्मश्री डॉ. ज्ञानदेव यशवंतराव (डी. वाय.) पाटील यांचे मंगळवारी सकाळी कोल्हापूर येथे वृद्धापकाळाने निधन झाले. ते ९० वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावली होती. त्यांच्या निधनाने राज्यभरातून हळहळ व्यक्त होत असून विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे.
डॉ. डी. वाय. पाटील यांनी आपल्या सार्वजनिक जीवनाची सुरुवात काँग्रेस पक्षातून केली. काँग्रेसच्या तिकिटावर ते नगरसेवक आणि त्यानंतर दोन वेळा आमदार म्हणून निवडून आले. १९५७ ते १९६२ या कालावधीत त्यांनी कोल्हापूरचे महापौर म्हणूनही काम पाहिले. मात्र, पुढे त्यांनी सक्रिय राजकारणापेक्षा शिक्षण आणि समाजसेवेवर अधिक भर दिला.
देशभरात शिक्षणसंस्थांचे विस्तृत जाळे उभारून त्यांनी हजारो विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली. वैद्यकीय महाविद्यालये, रुग्णालये आणि विविध आरोग्य संस्थांच्या माध्यमातून आरोग्य क्षेत्रातही त्यांनी मोलाचे योगदान दिले. नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट स्टेडियम उभारून क्रीडा क्षेत्रातही त्यांनी आपला ठसा उमटवला.
दीर्घकाळ काँग्रेसमध्ये कार्य केल्यानंतर २४ डिसेंबर २०१८ रोजी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता.
दरम्यान, डॉ. डी. वाय. पाटील यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी बुधवार, ५ ऑगस्ट रोजी सकाळी ११ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत यशवंत निवास, कसबा बावडा, कोल्हापूर येथे ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर सायंकाळी ४ वाजता अंत्ययात्रेला प्रारंभ होईल आणि सायंकाळी ५ वाजता डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेज, लाईन बाजार, कसबा बावडा येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.








