- लोकभवनात राज्यपालांच्या उपस्थितीत सोहळा
- लवकरच खातेवाटपाची घोषणा
बेंगळुरू : कर्नाटक राज्य मंत्रिमंडळाचा बहुप्रतीक्षित विस्तार आज पार पडला. राजधानीतील लोकभवन येथे आयोजित करण्यात आलेल्या शपथविधी सोहळ्यात एकूण १९ आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी सर्व नव्या मंत्र्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली.
या सोहळ्याला मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार, उपमुख्यमंत्री जी. परमेश्वर, मंत्रिमंडळातील वरिष्ठ सदस्य, लोकप्रतिनिधी आणि विविध मान्यवर उपस्थित होते. शपथविधीनंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी नव्या मंत्र्यांचे अभिनंदन करत त्यांच्या पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या.

मंत्रीपदाची शपथ घेणाऱ्यांमध्ये डॉ. अजय धर्मसिंग, एच. सी. बालकृष्ण, के. एस. बसवंतप्पा, बसवराज रायरेड्डी, एन. चेलुवरायास्वामी, लक्ष्मण सवदी, मधू बंगारप्पा, एस. एस. मल्लिकार्जुन, डी. नागेंद्र, पी. एम. नरेंद्रस्वामी, पुट्टुरंग शेट्टी, टी. रघुमूर्ती, रिझवान अर्शद, रुद्रप्पा लमाणी, संतोष लाड, के. एम. शिवलिंगेगौडा, शिवराज संगडगी, विजयानंद काशप्पनावर आणि बी. झेड. जमीर अहमद खान यांचा समावेश आहे.
शपथविधी सोहळ्यात अनेक मंत्र्यांनी ईश्वर, महापुरुष, आई आणि ज्येष्ठांच्या नावाने शपथ घेतल्याने कार्यक्रमाला विशेष भावनिक स्वरूप प्राप्त झाले.

दरम्यान, नव्या मंत्र्यांना लवकरच खात्यांचे वाटप करण्यात येणार असून, एक मंत्रिपद अद्याप रिक्त ठेवण्यात आले आहे. या जागेवर महिला आमदाराला संधी मिळण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे. मंत्रिमंडळ विस्तारानंतर राज्य सरकारच्या प्रशासनाला अधिक गती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.








