- गुन्ह्यांच्या तपासाला वैज्ञानिक बळ
- घटनास्थळीच अत्याधुनिक पुरावे संकलनाची सुविधा
बेळगाव : गुन्हेगारी तपास अधिक अचूक, वेगवान आणि वैज्ञानिक पद्धतीने करण्यासाठी बेळगाव शहर पोलीस दलाला अत्याधुनिक ‘मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन’ उपलब्ध झाली आहे. राज्य न्यायवैद्यक विज्ञान प्रयोगशाळेच्या सहकार्याने सुरू करण्यात आलेली ही सेवा घटनास्थळी तात्काळ पोहोचून वैज्ञानिक पुरावे गोळा करण्यास मदत करणार आहे.
या हाय-टेक व्हॅनमध्ये घटनास्थळ संरक्षण, डीएनए नमुने संकलन, लैंगिक अत्याचार प्रकरणांतील पुरावे जतन करणे, ड्रग स्क्रीनिंग यांसह एकूण १६ अत्याधुनिक फॉरेन्सिक किट्स उपलब्ध आहेत. याशिवाय बोटांचे ठसे, पावलांचे ठसे, शस्त्र व स्फोटकांचा शोध, तसेच डिजिटल पुरावे संकलित करण्यासाठी स्टिरिओ मायक्रोस्कोप आणि उच्च-तीव्रतेचे प्रकाश स्रोत यांसारखी आधुनिक उपकरणे बसविण्यात आली आहेत.
पुरावे सुरक्षित ठेवण्यासाठी व्हॅनमध्ये रेफ्रिजरेटर, जीपीएस-आधारित बॉडी-वॉर्न कॅमेरे, जनरेटर, फ्लड लाइट आणि उच्च-रिझोल्यूशन कॅमेऱ्यांचाही समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे घटनास्थळी कोणताही बदल होण्यापूर्वीच वैज्ञानिक पद्धतीने पुरावे संकलित करून तपास अधिक प्रभावीपणे करता येणार आहे.
याबाबत माहिती देताना शहर पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी सांगितले की, या मोबाईल फॉरेन्सिक व्हॅनमुळे गुन्ह्यांचा तपास अधिक सक्षम होईल. घटनास्थळावरील पुरावे शास्त्रीय पद्धतीने जतन केल्याने न्यायालयात भक्कम पुरावे सादर करण्यास मदत होईल आणि गुन्हेगारांना शिक्षा होण्याचे प्रमाणही वाढेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.








