- ६४ हजार किलोमीटरच्या बसफेऱ्या रद्द
- महाराष्ट्राकडे जाणाऱ्या मार्गांवरील सेवेला सर्वाधिक फटका
बेळगाव : ऊसदराच्या मागणीसाठी शेतकऱ्यांनी केलेल्या रास्ता रोको आंदोलनामुळे कर्नाटक राज्य परिवहन मंडळाच्या बेळगाव विभागाला दोन दिवसांत सुमारे १३.९७ लाख रुपयांच्या महसुलावर पाणी सोडावे लागले आहे. पुणे-बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक रोखण्यात आल्याने १३ आणि १४ ऑक्टोबर रोजी एकूण ६४ हजार ६३८ किलोमीटरच्या बसफेऱ्या रद्द कराव्या लागल्या. आंदोलनामुळे महाराष्ट्रासह कर्नाटकातील विविध शहरांकडे जाणाऱ्या बससेवेचे वेळापत्रकही विस्कळीत झाले.
१३ ऑक्टोबर रोजी कोगनोळी, हत्तरगी आणि हिरेबागेवाडी येथे ऊसदराच्या मागणीसाठी शेतकऱ्यांनी आंदोलन सुरू केले होते. आंदोलकांनी राष्ट्रीय महामार्ग रोखल्याने या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली. त्याचा परिणाम बेळगाव विभागाच्या बससेवेवर झाला. निपाणीमार्गे महाराष्ट्रात जाणाऱ्या कोल्हापूर, पुणे, मुंबई, बोरिवली आणि नाशिक या मार्गांवरील अनेक बसफेऱ्या रद्द कराव्या लागल्या. याशिवाय कर्नाटकातील विविध शहरांतून बेळगावकडे येणाऱ्या बसनाही वाहतूक कोंडीचा फटका बसला.
परिवहन मंडळाच्या आकडेवारीनुसार, १३ ऑक्टोबर रोजी १६ हजार ७४० किलोमीटरच्या बसफेऱ्या रद्द झाल्या. त्यामुळे सुमारे ८ लाख ३७ हजार ६७० रुपयांचा महसूल बुडाला. दुसऱ्या दिवशी, १४ ऑक्टोबर रोजी ४७ हजार ८९८ किलोमीटरच्या बसफेऱ्या रद्द करण्यात आल्या. या दिवशी सुमारे ५ लाख ५९ हजार १४६ रुपयांचे नुकसान झाले. दोन्ही दिवसांतील एकूण महसूल घट १३ लाख ९६ हजार ८१६ रुपये इतकी असून, रद्द झालेल्या बसफेऱ्यांचे अंतर ६४ हजार ६३८ किलोमीटर आहे.
गुरुवारी सर्व मार्गांवरील बससेवा पुन्हा सुरू करण्यात आली. मात्र, आंदोलन मागे घेतल्याची माहिती अनेक प्रवाशांपर्यंत वेळेत पोहोचली नसल्याने बससेवा पूर्ववत होऊनही प्रवाशांचा प्रतिसाद कमी राहिला. विशेषतः कोल्हापूरसह महाराष्ट्राकडे जाणाऱ्या मार्गांवर अपेक्षित गर्दी दिसून आली नाही. अनेक प्रवाशांनी आपला नियोजित प्रवास रद्द केल्याने बसमधील प्रवासीसंख्या कमी राहिली आणि परिवहन मंडळाच्या उत्पन्नावर त्याचा परिणाम झाला.








