- केंद्राच्या महागाई धोरणांवर लक्ष्मी हेब्बाळकर यांची टीका
बेळगाव : घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात पुन्हा २९ रुपयांची वाढ करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयावर माजी मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. सलग दरवाढीमुळे सर्वसामान्य नागरिक, मध्यमवर्गीय कुटुंबे आणि गृहिणींच्या अडचणीत भर पडत असल्याची टीका त्यांनी केली.
निवेदनाद्वारे प्रतिक्रिया देताना लक्ष्मी हेब्बाळकर म्हणाल्या की, गेल्या तीन महिन्यांतील ही दुसरी दरवाढ असून, यापूर्वी मार्च महिन्यात गॅस सिलेंडरच्या किमतीत ६० रुपयांची वाढ करण्यात आली होती. आता आणखी २९ रुपयांची वाढ झाल्याने तीन महिन्यांत एकूण ८९ रुपयांची वाढ झाली आहे. जीवनावश्यक वस्तूंच्या किमती सातत्याने वाढत असताना गॅस दरवाढ करून केंद्र सरकारने सामान्य नागरिकांवर अतिरिक्त आर्थिक भार टाकला आहे, अशी टीका त्यांनी केली.
त्या पुढे म्हणाल्या की, स्वयंपाकघर हे प्रत्येक कुटुंबाचे केंद्रबिंदू असते. गॅस सिलेंडरच्या दरातील वाढीचा थेट परिणाम घरगुती अर्थसंकल्पावर होत असतो. सध्या अनेक कुटुंबे वाढत्या महागाईमुळे दैनंदिन खर्च भागवण्यासाठी संघर्ष करत आहेत. अशा परिस्थितीत गॅसच्या किमती वाढविण्याचा निर्णय सर्वसामान्यांच्या हिताच्या विरोधातील आहे.
पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतींमुळे नागरिक आधीच त्रस्त आहेत. काही दिवसांपूर्वी व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरात वाढ झाल्याने हॉटेलमधील खाद्यपदार्थ, चहा, कॉफी आणि जेवणाच्या किमती वाढल्या आहेत. आता घरगुती गॅस सिलेंडरच्या दरवाढीमुळे सामान्य कुटुंबांचे जगणे आणखी कठीण होणार असल्याचे त्यांनी नमूद केले.
केंद्र सरकारवर टीका करताना त्यांनी सांगितले की, २०१४ मध्ये स्वस्त गॅस आणि महागाई नियंत्रणाची आश्वासने देत सत्तेत आलेल्या सरकारकडून आज सर्वसामान्य नागरिकांवर सातत्याने आर्थिक बोजा टाकला जात आहे. महागाई रोखण्याऐवजी दरवाढीचे निर्णय घेतले जात असल्याने जनतेमध्ये असंतोष वाढत आहे, असेही त्या म्हणाल्या.
केंद्र सरकारने घरगुती गॅस सिलेंडरच्या दरवाढीचा निर्णय तात्काळ मागे घ्यावा आणि महागाईने होरपळणाऱ्या कुटुंबांना दिलासा द्यावा, अशी मागणी लक्ष्मी हेब्बाळकर यांनी केली आहे. तसेच जनतेच्या हिताला प्राधान्य देणारी धोरणे राबवून सर्वसामान्यांच्या अडचणी कमी करण्यासाठी पावले उचलावीत, असे आवाहनही त्यांनी केले.








