• सुदैवाने जीवितहानी टळली ; हल्याळ रस्त्यावरील घटना

अथणी : मुसळधार पावसामुळे अथणी शहरातील हल्याळ रस्त्यावरील एक जुनी इमारत अचानक कोसळून जमीनदोस्त झाली. सुदैवाने दुर्घटनेच्या वेळी इमारतीत किंवा परिसरात कोणीही नसल्याने मोठी जीवितहानी टळली.

अथणी शहरात शुक्रवारी रात्री झालेल्या जोरदार पावसाचा फटका अनेक भागांना बसला. हल्याळ रस्त्यावरील रावसाब ऐहोळे यांच्या मालकीची जुनी इमारत पावसामुळे कमकुवत झाल्यानंतर अचानक कोसळली. सततच्या पावसामुळे इमारतीच्या भिंती खचल्याने ही दुर्घटना घडल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.

इमारत कोसळल्याचा मोठा आवाज होताच परिसरातील नागरिकांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले. अनेकांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र, दुर्घटनेच्या वेळी इमारतीत कोणतीही व्यक्ती नसल्याने तसेच आसपासही वर्दळ नसल्याने कोणतीही जीवितहानी किंवा दुखापत झाली नाही.

घटनेची माहिती मिळताच संबंधित अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर धोकादायक आणि जीर्ण इमारतींची तपासणी करून आवश्यक ती खबरदारी घेण्याची गरज यानिमित्ताने पुन्हा अधोरेखित झाली आहे.