• बेळगाव बार असोसिएशनचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

बेळगाव : अथणी तालुक्यातील सत्ती गावात झालेल्या जातीय संघर्षानंतर परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी गेलेल्या पोलिसांनी निष्पाप वकीलाला बेदम मारहाण केल्याचा आरोप होत असून, या घटनेबाबत बेळगाव बार असोसिएशनने तीव्र संताप व्यक्त केला आहे. संबंधित पोलीस कर्मचाऱ्यांवर तात्काळ निलंबनाची कारवाई करून उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी असोसिएशनने मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

सत्ती गावातील जातीय संघर्षानंतर बालकृष्ण क्लिनिकसमोर बसलेल्या वकील मल्लिकार्जुन कोरी यांना पोलिसांनी जमावातील व्यक्ती समजून मारहाण केल्याची घटना घडली. आपण वकील असून या घटनेशी कोणताही संबंध नसल्याचे वारंवार सांगूनही पोलिसांनी त्यांचे म्हणणे ऐकून घेतले नसल्याचा आरोप करण्यात आला आहे.

या मारहाणीत वकिलाचा छळ झाला असून त्यांच्या व्यवसायाचाही अवमान झाल्याचे बार असोसिएशनने म्हटले आहे. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समाजमाध्यमांवर प्रसारित झाल्यानंतर वकिलांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. राज्यात ‘वकील हिंसाचार प्रतिबंधक कायदा’ अस्तित्वात असतानाही पोलिसांकडून अशा प्रकारची घटना घडल्याबद्दल असोसिएशनने नाराजी व्यक्त केली आहे.

बेळगाव बार असोसिएशनचे सरचिटणीस सचिन आर. शिवण्णावर यांनी संबंधित पोलीस उपनिरीक्षक आणि कॉन्स्टेबल यांना तात्काळ निलंबित करून त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष आणि उच्चस्तरीय चौकशी करून संबंधित वकिलाला न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

या संदर्भातील निवेदन मुख्यमंत्री, पोलीस महानिरीक्षक आणि पोलीस अधीक्षक यांना पाठविण्यात आले असून, दोषींवर कठोर कारवाई होण्याची अपेक्षा बार असोसिएशनने व्यक्त केली आहे.