• कंटेनर चालकाचा जागीच मृत्यू

बेळगाव : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४ वर हत्तरगी टोल नाक्याजवळ झालेल्या भीषण अपघातात एका कंटेनर चालकाचा जागीच मृत्यू झाला. मध्यरात्रीच्या सुमारास घडलेल्या या घटनेनंतर यमकनमर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

यमकनमर्डी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हंचनाळ गावाजवळ, शिवप्रसाद हॉटेलसमोर हा अपघात घडला. तामिळनाडू राज्यातील दिंडीगुल जिल्ह्यातील कुपैपट्टी येथील रहिवासी जयकुमार एस. सेल्लादुराई (वय ३४) असे मृत चालकाचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जयकुमार हे आपल्या ताब्यातील कंटेनर घेऊन संकेश्वरकडून बेळगावच्या दिशेने जात होते. यावेळी त्यांच्या कंटेनरची पुढे चाललेल्या ट्रकला मागून जोरदार धडक बसली. धडकेची तीव्रता इतकी होती की, कंटेनरचे मोठे नुकसान झाले आणि चालक जयकुमार यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

या प्रकरणी ट्रकमधील क्लिनर प्रताप बाबूराव तिडके यांनी दिलेल्या फिर्यादीवरून यमकनमर्डी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक जावेद मुशापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली या अपघाताचा पुढील तपास सुरू आहे.