बेळगाव : जादा व्याजाचे आमिष दाखवून ठेवीदारांकडून कोट्यवधी रुपयांच्या ठेवी गोळा केल्याचा आरोप असलेल्या आदित्यराज कॅपिटल प्रायव्हेट लिमिटेड या संस्थेवर बेळगावचे उपविभागीय अधिकारी शरवण नायक यांच्या नेतृत्वाखालील पथकाने गुरुवारी धाड टाकली. भाग्यनगर येथील संस्थेच्या कार्यालयात ही कारवाई करण्यात आली असून, आर्थिक व्यवहारांसंदर्भातील कागदपत्रांची तपासणी सुरू आहे.
शिवानंद नीलण्णावर प्रकरणानंतर समोर आलेल्या या नव्या कथित आर्थिक घोटाळ्यामुळे ठेवीदारांमध्ये चिंता व्यक्त होत आहे. कोणतीही ठोस सुरक्षा न देता केवळ जादा परताव्याचे आश्वासन देत सर्वसामान्य नागरिकांकडून ठेवी स्वीकारून त्या रकमेची इतरत्र गुंतवणूक केल्याचा आरोप संस्थेवर आहे. याप्रकरणी संस्थेविरोधात केपीआयडी आणि बड्स सेल अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारीच्या आधारे उपविभागीय अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखालील पथकाने कार्यालयात जाऊन विविध कागदपत्रे, आर्थिक नोंदी आणि व्यवहारांची तपासणी केली. या कारवाईदरम्यान टिळकवाडी पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी बंदोबस्त ठेवला होता.
महाराष्ट्रातील बलराम माने यांच्या मालकीच्या या कंपनीने बेळगावातील नागरिकांना जास्त व्याजाचे आमिष दाखवून मोठ्या प्रमाणात ठेवी गोळा केल्याचा आरोप करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, अधिकाऱ्यांच्या कारवाईनंतर कंपनीची अधिकृत वेबसाईट अचानक बंद करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न झाला का, याचाही तपास यंत्रणांकडून केला जात आहे.
ठेवीदारांच्या पैशांचा वापर नेमका कसा करण्यात आला, कंपनीचे आर्थिक व्यवहार कितपत नियमबाह्य होते आणि फसवणुकीचे आरोप कितपत सत्य आहेत, याचा सखोल तपास सुरू असून चौकशीनंतर आणखी माहिती समोर येण्याची शक्यता आहे.








