- मंत्री सतीश जारकीहोळी
बेळगाव : राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी सरकार कटिबद्ध असून बेळगावच्या विकासकामांना गती देणे हेच आमचे प्रमुख ध्येय आहे. माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या कधीही एकटे नाहीत, आम्ही सर्वजण त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत, असे स्पष्ट प्रतिपादन सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी यांनी केले. तसेच मंत्रिमंडळ विस्तार याच महिन्यात होण्याची शक्यता असल्याचेही त्यांनी सांगितले.
आज आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना मंत्री सतीश जारकीहोळी म्हणाले की, सार्वजनिक बांधकाम खाते मिळावे अशी त्यांनी कोणतीही मागणी केली नव्हती. मात्र, त्यांच्या कामकाजाच्या पद्धतीवर विश्वास ठेवून पक्षश्रेष्ठी आणि मुख्यमंत्री यांनी त्यांच्याकडे हेच खाते कायम ठेवले आहे. राज्यात नवीन रस्ते, पूल आणि बेळगाव उड्डाणपुलासह विविध विकासकामे पूर्ण करणे हे आमचे स्वप्न असल्याचे त्यांनी नमूद केले.
बेळगावच्या राजकीय प्रतिनिधित्वाबाबत बोलताना ते म्हणाले की, जिल्ह्याला लवकरच आणखी एक मंत्रीपद मिळण्याची शक्यता आहे. सध्या मंत्रिमंडळात सुमारे २० जागा रिक्त असून जुलै महिन्यात होणाऱ्या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर याच महिन्यात मंत्रिमंडळ विस्ताराची प्रक्रिया पूर्ण होऊ शकते, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
केपीसीसी अध्यक्षपदाबाबत विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना जारकीहोळी म्हणाले की, काँग्रेस पक्ष ‘एक व्यक्ती, एक पद’ या तत्त्वाचे पालन करत आहे. विविध समाजघटक आणि विशेषतः मुस्लिम नेत्यांच्या मागण्या पक्षश्रेष्ठींपर्यंत पोहोचविण्यात आल्या असून अंतिम निर्णय वरिष्ठ नेतृत्व घेईल.
माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या नेतृत्वासंदर्भात विचारलेल्या प्रश्नावर ते म्हणाले, “सिद्धरामय्या कधीही एकटे नसतात. आम्ही सर्वजण त्यांच्यासोबत आहोत. खातेवाटपाबाबत निर्माण झालेले किरकोळ गैरसमजही ते दूर करतील.” अहिंद विचारसरणी आणि संघटनेला आपला कायम पाठिंबा राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
बेळगाव महानगरपालिकेत ‘महाजन अहवाल अंतिम’ ठराव मंजूर होण्यास होत असलेल्या विलंबाबाबत प्रतिक्रिया देताना जारकीहोळी यांनी भाजप आमदारांनी याबाबत पुढाकार घ्यावा, असे सांगितले. तसेच या विषयावर आपण जिल्हाधिकाऱ्यांशी वैयक्तिकरित्या चर्चा करणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.








