- वृद्ध महिलेला तातडीने उपचार व संरक्षण देण्याचे प्रशासनाला निर्देश
बेळगाव : सौंदत्ती तालुक्यातील मुनवळ्ळी येथे एका वृद्ध महिलेला निर्जन ठिकाणी सोडून दिल्याची धक्कादायक घटना समोर आल्यानंतर महिला व बालविकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी तत्काळ हस्तक्षेप करत संबंधित महिलेला आवश्यक वैद्यकीय उपचार, संरक्षण आणि पुनर्वसनाची सुविधा उपलब्ध करून देण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत.
मुनवळ्ळी गावाबाहेरील निर्जन परिसरात आजारी अवस्थेतील वृद्ध महिलेला सोडून दिल्याच्या घटनेची प्रसारमाध्यमांतून माहिती मिळताच मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी तीव्र दुःख व्यक्त केले. त्यांनी बेळगावचे जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त आणि जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याशी संपर्क साधून तातडीने कारवाई करण्याचे आदेश दिले.
या महिलेला योग्य वैद्यकीय उपचार मिळावेत, तिच्या सुरक्षेची काळजी घ्यावी आणि पुनर्वसनासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, असे निर्देश देताना मंत्री हेब्बाळकर यांनी या प्रकरणात निष्काळजीपणा अथवा कायद्याचे उल्लंघन झाल्याचे आढळल्यास संबंधितांविरोधात कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही दिला.
दरम्यान, जिल्हा प्रशासनाने या घटनेची गंभीर दखल घेत आवश्यक ती कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासन दिले आहे. वृद्ध महिलेला मदत मिळावी आणि अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी प्रशासन सक्रिय झाले आहे.








