बेंगळुरू : कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी आपल्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देण्याची घोषणा केल्याने राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. आपण कोणत्याही नाराजीशिवाय आणि पूर्ण मनापासून हा निर्णय घेत असल्याचे त्यांनी स्पष्ट केल्याचे सांगितले जात आहे.
मुख्यमंत्रिपदाच्या बदलाबाबत सुरू असलेल्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस हायकमांडच्या सूचनेनुसार सिद्धरामय्या यांनी उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार आणि मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांसोबत ‘कावेरी’ या शासकीय निवासस्थानी महत्त्वाची बैठक घेतली. यावेळी त्यांनी आपण पद सोडण्याचा निर्णय घेतल्याची माहिती दिल्याचे सूत्रांनी सांगितले.
दिल्लीतील बैठकीत काँग्रेस नेतृत्वासोबत सत्ता हस्तांतरणासंदर्भात चर्चा झाल्यानंतर सिद्धरामय्या यांनी या निर्णयाला सहमती दर्शवल्याचे बोलले जात आहे. तसेच राहुल गांधी यांच्याकडून थेट संदेश आल्यानंतर त्यांनी राजीनाम्याचा निर्णय घेतल्याचीही चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
या बैठकीत डी. के. शिवकुमार यांच्यासह जी. परमेश्वर, एम. सी. सुधाकर, बैरती सुरेश, संतोष लाड आणि रामलिंगा रेड्डी यांच्यासह अनेक वरिष्ठ नेते उपस्थित होते.
पुढील मुख्यमंत्री कोण होणार याबाबत अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आलेली नसून अंतिम निर्णय काँग्रेस हायकमांड घेणार असल्याचे सिद्धरामय्या यांनी स्पष्ट केल्याचे सांगण्यात येत आहे.
दरम्यान, सिद्धरामय्या यांनी राजीनाम्याची घोषणा केल्यानंतर डी. के. शिवकुमार भावूक झाल्याचे दृश्य बैठकीत पाहायला मिळाले. गेल्या काही दिवसांपासून दिल्लीमध्ये काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांसोबत कर्नाटकातील नेतृत्वबदलावर चर्चा सुरू होती. यामध्ये के. सी. वेणुगोपाल यांचाही सहभाग होता.
यानंतर सिद्धरामय्या राजीनामा सादर करण्यासाठी लोकभवनात गेले होते. मात्र राज्यपाल थावरचंद गहलोत हे बेंगळुरूमध्ये नसल्याने काही तांत्रिक अडचणी निर्माण झाल्याचे समोर आले. राज्यपालांचे मुख्य सचिव प्रभू शंकर यांच्याकडे राजीनामा सादर करण्यात आला असता, प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी काही औपचारिक बाबी असल्याचे सांगण्यात आल्याची माहिती मिळत आहे.








