बेळगाव : वारसदार नसलेल्या दोन व्यक्तींच्या मृत्यूनंतर त्यांच्या अंत्यसंस्काराची जबाबदारी स्वीकारत माजी महापौर विजय मोरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी माणुसकीचे दर्शन घडविले. दोन्ही मृतदेहांवर सदाशिवनगर स्मशानभूमीत सन्मानपूर्वक अंत्यसंस्कार करण्यात आले.
बेळगाव मध्यवर्ती बसस्थानक परिसरात आश्रय घेतलेल्या एका आजारी व्यक्तीला उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या व्यक्तीचा कोणीही वारसदार नसल्याने मार्केट पोलिसांनी माजी महापौर विजय मोरे यांच्याशी संपर्क साधला.
दरम्यान, मच्छे येथील निर्वासित मदत केंद्रात वास्तव्यास असलेल्या एका महिलेचाही सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असताना मृत्यू झाला. तिचेही कोणी नातेवाईक नसल्याने केंद्राच्या कर्मचाऱ्यांनी विजय मोरे आणि अवधूत तुडवेकर यांच्याकडे मदतीची विनंती केली.
दोन्ही घटनांची माहिती मिळताच विजय मोरे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने पुढाकार घेत दोन्ही मृतदेहांवर सदाशिवनगर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले. या उपक्रमातून समाजातील निराधार व्यक्तींच्या अंतिम प्रवासातही माणुसकी जपण्याचा आदर्श त्यांनी घालून दिला.
यावेळी ॲलन विजय मोरे, अवधूत तुडवेकर, पद्मप्रसाद हुली, प्रकाश मुचंडीकर, निसार शमशेर, संजय मेथ्री, स्मशानभूमीचे कर्मचारी आणि मार्केट पोलीस ठाण्याच्या अधिकारी सुजाता उपस्थित होत्या.








