- समाजाचे आरोग्य विनोदामुळे टिकते ; ग्रंथ हे समाजाचे सुख असते : डॉ. रमेश वरखेडे
बेळगाव : लोकमान्य ग्रंथालयातर्फे यंदापासून साहित्य क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या साहित्यिकांना पुरस्कार देण्याचा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. या उपक्रमांतर्गत पहिल्या वर्षी बेळगाव आणि परिसरातील चार साहित्यिकांची पुरस्कारासाठी निवड करून त्यांचा सन्मान करण्यात आला.
सोमवारी (१६ नोव्हेंबर) टिळकवाडी येथील लोकमान्य ग्रंथालय-वरेरकर नाट्य संघ सभागृहात आयोजित कार्यक्रमात नाशिकचे ज्येष्ठ विचारवंत, लेखक आणि संपादक डॉ. रमेश वरखेडे यांच्या हस्ते प्रा. सुभाष सुंठणकर, डॉ. शोभा नाईक, प्रा. डॉ. द. तु. पाटील आणि पूजा भडांगे यांना साहित्य पुरस्कार प्रदान करण्यात आले. शाल, श्रीफळ, पुस्तक आणि रोख रक्कम असे पुरस्काराचे स्वरूप होते. यावेळी ज्येष्ठ कवयित्री डॉ. मंगला वरखेडे उपस्थित होत्या.
मुख्य भाषणात डॉ. रमेश वरखेडे यांनी लोकमान्य ग्रंथालयाच्या उपक्रमाचे कौतुक केले. ज्ञानप्रवर्तनाच्या प्रक्रियेत ग्रंथपालाची भूमिका महत्त्वाची असून तो उत्प्रेरकाप्रमाणे कार्य करतो, असे त्यांनी सांगितले. समाजाचे आरोग्य टिकवण्यासाठी विनोद महत्त्वाचा असून परिपक्व समाजाला विनोदाची जाण असते, असेही त्यांनी नमूद केले. समीक्षा, कथा, कविता आणि लोककथा या साहित्यप्रकारांवर भाष्य करताना प्रत्येक मुलामध्ये प्रतिभा असते, ती ओळखून विकसित करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
पुरस्काराला उत्तर देताना चारही साहित्यिकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. येळ्ळूर साहित्य संमेलन, ज्येष्ठ साहित्यिक कै. अनंत मनोहर, लोकमान्य ग्रंथालय, अन्य वाचनालये, प्रकाशक आणि वाचकांचे त्यांनी आभार मानले. आपल्या कर्मभूमीत मिळालेला हा पुरस्कार विशेष आनंद देणारा असल्याचे सांगत, पुरस्कारामुळे प्रगल्भता, प्रोत्साहन आणि जबाबदारीची जाणीव वाढते, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
यावेळी मराठी विद्या निकेतन आणि वि. गो. साठे प्रबोधिनीतर्फे चारही पुरस्कारप्राप्त साहित्यिकांचा पुष्पगुच्छ आणि भेटकार्ड देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या प्रारंभी सावंतवाडीच्या कवयित्री शरयू आसोलकर यांच्या निधनाबद्दल श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
कार्यक्रमात बुलकचे उपाध्यक्ष किशोर काकडे यांनी सूत्रसंचालन केले. कार्याध्यक्ष जगदीश कुंटे यांनी डॉ. रमेश वरखेडे यांचे, तर ग्रंथपाल रंजना कारेकर यांनी डॉ. मंगला वरखेडे यांचे पुस्तक देऊन स्वागत केले. माधव कुंटे आणि अनुजा पाटील यांनी पुरस्कारप्राप्त साहित्यिकांचा परिचय करून दिला. माधव कुंटे यांनी आभार मानले.
या कार्यक्रमाला साहित्यप्रेमी आणि रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. महाराष्ट्र राज्य मराठी विकास संस्थेचे अर्थसाहाय्य या उपक्रमाला लाभले आहे.








