• आर. हितेंद्र यांच्याकडे बेंगळुरू पोलीस आयुक्तपद
  • हेमंत निंबाळकर वाहतूक आयुक्त

बेंगळुरू : शहरातील कायदा व सुव्यवस्था अधिक सक्षम करण्यासह वाहतूक कोंडीवर प्रभावी नियंत्रण मिळविण्यासाठी राज्य सरकारने बेंगळुरू पोलीस आयुक्तालयाची पुनर्रचना करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. त्यानुसार बृहत् बेंगळुरू पोलीस आयुक्तालयाची मध्य, पूर्व, पश्चिम, उत्तर आणि दक्षिण अशा पाच स्वतंत्र आयुक्तालयांमध्ये विभागणी करण्यात आली आहे. या फेरबदलात ३० हून अधिक आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या व नव्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.

वरिष्ठ आयपीएस अधिकारी आर. हितेंद्र यांची बेंगळुरू शहराच्या मुख्य पोलीस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. विद्यमान पोलीस आयुक्त सीमांत कुमार सिंग यांची अग्निशमन दलाच्या अतिरिक्त पोलीस महासंचालकपदी बदली करण्यात आली आहे. तर हेमंत निंबाळकर यांच्याकडे बेंगळुरू वाहतूक पोलीस आयुक्तपदासह गुंडगिरीविरोधी पथकाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

नव्याने स्थापन करण्यात आलेल्या पाच आयुक्तालयांच्या प्रमुखपदी अनुक्रमे मध्य विभागासाठी लाभू राम, पूर्व विभागासाठी डॉ. पी. एस. हर्षा, पश्चिम विभागासाठी विकास कुमार विकास, उत्तर विभागासाठी डॉ. एम. बी. बोरलिंगय्या आणि दक्षिण विभागासाठी सी. वामसी कृष्णा यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

याशिवाय विजय कुमार सिंह यांची कायदा व सुव्यवस्था विभागाच्या अतिरिक्त पोलीस महासंचालकपदी, एस. मुरुगन यांची लोकायुक्तांच्या अतिरिक्त पोलीस महासंचालकपदी आणि मनीष खरबिकर यांची दळणवळण विभागात नियुक्ती करण्यात आली आहे. एन. शशीकुमार यांच्याकडे पश्चिम विभागाच्या पोलीस महानिरीक्षकपदाची, तर अनुपम अग्रवाल यांच्याकडे कर्नाटक राज्य राखीव पोलीस दलाच्या पोलीस महानिरीक्षकपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. कुलदीप कुमार आर. जैन यांची कलबुर्गी शहराच्या पोलीस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

दरम्यान, बेंगळुरूतील विविध विभागांमध्ये पोलीस उपायुक्तपदाच्या नियुक्त्याही करण्यात आल्या आहेत. यामध्ये लक्ष्मण निंबर्गी, अशोक के. व्ही., चन्नबसवन्ना लंगोटी, नागेश डी. एल., डॉ. गीता एम. एस. आणि पी. व्ही. स्नेहा यांच्यासह अनेक अधिकाऱ्यांचा समावेश आहे.

या प्रशासकीय फेररचनेमुळे बेंगळुरू शहरातील पोलीस यंत्रणेचे विकेंद्रीकरण होऊन कायदा व सुव्यवस्था, गुन्हे नियंत्रण आणि वाहतूक व्यवस्थापन अधिक प्रभावी होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.