- पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांच्याकडून तयारीचा आढावा
बेळगाव : विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन आणि जिज्ञासा वाढविण्याच्या उद्देशाने बेळगावमध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या सहाव्या राज्यस्तरीय विज्ञान संमेलनासाठी सर्व विभागांनी समन्वयाने आणि नियोजनबद्ध पद्धतीने तयारी करावी, असे निर्देश जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात सोमवारी (१६ नोव्हेंबर) आयोजित विज्ञान संमेलनाच्या पूर्वतयारी बैठकीत ते बोलत होते. येत्या २७ ते २९ डिसेंबर या कालावधीत शहरातील सी.पी.एड. मैदानावर हे तीन दिवसीय संमेलन होणार आहे.
विज्ञान संमेलनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना वैज्ञानिक विचारांची ओळख करून देण्याबरोबरच त्यांच्यात संशोधनाची आवड निर्माण करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. जिल्ह्यातील अधिकाधिक विद्यार्थ्यांनी या उपक्रमात सहभागी व्हावे, यासाठी आवश्यक नियोजन करण्याची सूचना जारकीहोळी यांनी केली.
बेळगाव आणि चिक्कोडी शैक्षणिक जिल्ह्यांतील सरकारी तसेच खासगी शाळांच्या विद्यार्थ्यांना संमेलनस्थळी आणण्यासाठी विशेष व्यवस्था करावी. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा सहभाग वाढविण्यासाठी ग्रामपंचायतींच्या माध्यमातून बसची सोय करावी. खासगी शाळांनी त्यांच्या वाहनांचा वापर करावा. तसेच बेळगाव शहरातील निवासी शाळांमधील विद्यार्थ्यांनाही संमेलनात सहभागी करून घेण्यासाठी संबंधित विभागांनी प्रयत्न करावेत, असे त्यांनी सांगितले.
संमेलनाच्या ठिकाणी शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी आणि पाण्याची गुणवत्ता तपासूनच पुरवठा करावा. सरकारी विभागांच्या स्टॉल्ससोबत वैज्ञानिक संशोधन आणि तंत्रज्ञान क्षेत्रात कार्यरत असलेल्या खासगी संस्थांनाही स्टॉल्स उभारण्याची संधी द्यावी. संमेलनाच्या यशस्वी आयोजनासाठी राज्य विज्ञान परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांशी सातत्याने संपर्क ठेवून तयारीचा आढावा घ्यावा, असेही पालकमंत्र्यांनी स्पष्ट केले.
जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी संमेलनासाठी विविध समित्या स्थापन करून प्रत्येक समितीसाठी नोडल अधिकारी नियुक्त करण्यात येणार असल्याचे सांगितले. सी.पी.एड. मैदानावरील कार्यक्रमाच्या आयोजनाची संपूर्ण रूपरेषा ३० नोव्हेंबरपूर्वी तयार करण्याचे निर्देश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
संमेलनाला उपस्थित राहणाऱ्या मान्यवरांची माहिती आधीच उपलब्ध करून दिल्यास त्यांच्या निवासाची योग्य व्यवस्था करता येईल. तसेच कार्यक्रमस्थळी आपत्कालीन वैद्यकीय पथक आणि अग्निशमन दल सज्ज ठेवण्याची कार्यवाही करावी, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी सूचित केले.
राज्य वैज्ञानिक संशोधन परिषदेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. हुलीकल नटराज यांनी संमेलनाच्या आयोजनामागील भूमिका स्पष्ट केली. विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाविषयी कुतूहल आणि जागरूकता निर्माण करण्यासाठी या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे. २०२१ पासून राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये पाच विज्ञान संमेलने यशस्वीपणे पार पडली असून, यंदाचे सहावे संमेलन बेळगावमध्ये होत असल्याचे त्यांनी सांगितले.
तीन दिवस चालणाऱ्या या संमेलनाचे सभाध्यक्ष म्हणून ज्येष्ठ वकील प्रा. रविवर्मा उपस्थित राहणार आहेत. विद्यार्थ्यांना विज्ञानातील विविध संशोधन आणि उपलब्धींची माहिती मिळावी यासाठी विविध विषयांवरील स्टॉल्स तसेच फिरत्या तारांगणाची व्यवस्था करण्यात येणार आहे. २७ डिसेंबर रोजी संमेलनाध्यक्षांना मिरवणुकीने कार्यक्रमस्थळी आणण्यासह व्यासपीठ आणि अन्य व्यवस्थांबाबतही डॉ. नटराज यांनी माहिती दिली.
बैठकीला आमदार आसिफ (राजू) सेठ, पोलीस आयुक्त प्रकाश निकम, प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी रोहित सिंह, अप्पर जिल्हाधिकारी विजयकुमार होनकेरी, जिल्हा पंचायत योजना संचालक रवी बंगारप्पनवर, कन्नड आणि संस्कृती विभागाच्या उपसंचालक विद्यावती बजंत्री यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.








