- महिनाभरापासून रस्त्यालगत कचऱ्याचे ढीग
- ग्रामस्थ आणि ऑटोचालकांचे तीव्र आंदोलन
बेळगाव : तालुक्यातील कंग्राळी खुर्द गावात कचरा विल्हेवाटीचा प्रश्न गंभीर बनला असून, रस्त्याच्या कडेला साचलेल्या कचऱ्यामुळे ग्रामस्थांचा संताप शिगेला पोहोचला आहे. गेल्या महिनाभरापासून मुख्य रस्त्यालगत कचरा सडत पडला असतानाही प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचा आरोप करत ग्रामस्थ आणि ऑटोचालकांनी आज रस्त्यावर उतरून जोरदार आंदोलन केले.
कंग्राळी खुर्द गावातील मुख्य रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात कचरा साचला असून, परिसरात तीव्र दुर्गंधी पसरली आहे. त्यामुळे शाळकरी मुले, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत असून, आरोग्याचा प्रश्नही निर्माण झाला आहे. गेल्या २० दिवसांहून अधिक काळापासून ग्रामस्थांनी हा प्रश्न प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिला असला तरी अद्याप कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नसल्याचा आरोप आंदोलकांनी केला.
यावेळी संतप्त ग्रामस्थांनी महापालिका आणि ग्रामपंचायत प्रशासनावर गंभीर आरोप करत, दोन्ही यंत्रणा जबाबदारी एकमेकांवर ढकलत असल्याचे सांगितले. महापालिका अधिकारी हा भाग ग्रामपंचायतीच्या हद्दीत येत असल्याचे सांगत आहेत, तर ग्रामपंचायत प्रशासन पालिकेकडे बोट दाखवत आहे. या सीमावादाचा फटका मात्र सामान्य नागरिकांना बसत असल्याची भावना आंदोलकांनी व्यक्त केली.
ग्रामस्थांनी सांगितले की, रस्त्यावरील कचऱ्यामुळे काही दिवसांपूर्वी एका व्यक्तीचा अपघाती मृत्यू झाला होता. तरीही प्रशासनाने यापासून कोणताही धडा घेतलेला नाही. कचऱ्याची तातडीने विल्हेवाट लावून या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढावा, अन्यथा येत्या काही दिवसांत आणखी तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा ग्रामस्थ आणि ऑटोचालकांनी दिला आहे.
आंदोलनादरम्यान प्रशासनाविरोधात घोषणाबाजी करण्यात आली असून, कंग्राळी खुर्द गावातील कचरा समस्येकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.








