बेळगाव : श्रीक्षेत्र दक्षिणकाशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कपिलेश्वर मंदिरात भाविकांसाठी ड्रेसकोड लागू करण्यात आला आहे. मंदिराचे पावित्र्य आणि धार्मिक वातावरण कायम राखण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती मंदिर प्रशासनाने दिली आहे.
नवीन नियमांनुसार पाश्चात्त्य किंवा अती तोकडे कपडे परिधान करून येणाऱ्या भाविकांना मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही. पुरुषांना हाफ पॅंट घालून प्रवेश करता येणार नसून महिलांनी गाऊन किंवा अती फॅन्सी आणि तोकडे कपडे घालून येऊ नये, असे स्पष्ट करण्यात आले आहे. साडी व्यतिरिक्त इतर पारंपरिक पोशाख परिधान करणाऱ्या महिलांसाठी दुपट्टा वापरणे आवश्यक करण्यात आले आहे.
या संदर्भातील सूचना मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारावर फलकाद्वारे प्रदर्शित करण्यात आल्या आहेत. मंदिरात दररोज मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी येतात. विशेषतः सोमवारी तसेच महाशिवरात्रीसारख्या धार्मिक उत्सवांच्या काळात भाविकांची संख्या लक्षणीय वाढत असते.
मंदिर प्रशासनाच्या मते, काही भाविक पर्यटनस्थळांवरून परतताना किंवा इतर कारणांनी पाश्चात्त्य वेशभूषेत मंदिरात येत असल्याचे आढळून आले होते. तसेच काही जण मंदिर परिसरात धार्मिक स्थळांच्या पार्श्वभूमीवर सामाजिक माध्यमांसाठी चित्रिकरण करत असल्याचेही निदर्शनास आले होते. या पार्श्वभूमीवर मंदिरातील शिस्त आणि पावित्र्य कायम राखण्यासाठी ड्रेसकोड लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला.
मंदिराचे मुख्य पुजारी नागराज कट्टी यांनी सांगितले की, १ एप्रिलपासून प्रायोगिक तत्त्वावर ही व्यवस्था सुरू करण्यात आली असून, भाविकांकडूनही याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. मंदिरात येणाऱ्या प्रत्येकाने धार्मिक स्थळाचे महत्त्व लक्षात घेऊन योग्य वेशभूषेत यावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.








