बेळगाव : पंतप्रधान विकसित भारत रोजगार योजनेअंतर्गत १९ जून रोजी बेळगावमध्ये राष्ट्रीय स्तरावरील ‘विकसित भारत रोजगार’ कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. शहरातील फाउंड्री क्लस्टर येथे होणाऱ्या या कार्यक्रमात रोजगार, सामाजिक सुरक्षा आणि कामगार कल्याणाशी संबंधित विविध योजनांची माहिती नागरिकांना दिली जाणार आहे.

ही माहिती हुबळी विभागाचे भविष्य निर्वाह निधी प्रादेशिक आयुक्त निरंजन गुप्ता यांनी पत्रकार परिषदेत दिली. त्यांनी सांगितले की, या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश पंतप्रधान विकसित भारत रोजगार योजना तसेच सामाजिक सुरक्षा योजनांबाबत जनजागृती करणे आणि उद्योग क्षेत्रातील मालक व लाभार्थी यांच्यात थेट संवाद घडवून आणणे हा आहे.

कार्यक्रमादरम्यान नवनियुक्त कर्मचाऱ्यांना नियुक्तीपत्रांचे वितरण करण्यात येणार असून, कामगार कल्याणासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजना आणि अलीकडील कामगार सुधारणा यांची सविस्तर माहितीही उपस्थितांना देण्यात येणार आहे.

या कार्यक्रमाला बेळगावचे खासदार जगदीश शेट्टर उपस्थित राहणार असून सुमारे २०० जण सहभागी होतील, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. रोजगार आणि सामाजिक सुरक्षा योजनांचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या नागरिकांनी या कार्यक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

या पत्रकार परिषदेला सहाय्यक भविष्य निर्वाह निधी आयुक्त शुभम मीना, अंमलबजावणी अधिकारी महेश जिंदे तसेच इतर अधिकारी उपस्थित होते.