- पत्नीने प्रियकराच्या मदतीने विष देऊन हत्या केल्याचा आरोप
- दोन कोटींच्या विम्यासाठी कट ; तीन महिन्यांनंतर मृतदेह बाहेर काढला
बेळगाव : हुक्केरी तालुक्यातील गोडगेरी येथील माजी सैनिक संदीप मंजरगी यांच्या मृत्यूमागील धक्कादायक माहिती तीन महिन्यांनंतर समोर आली असून, पत्नीनेच प्रियकराच्या मदतीने विष देऊन हत्या केल्याचा संशय पोलिस तपासातून पुढे आला आहे. या प्रकरणामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संदीप मंजरगी हे अपघातात जखमी झाल्यानंतर घटप्रभा येथील रुग्णालयात उपचार घेत होते. याच काळात पत्नी सुमा हिने तिच्या प्रियकर पुंडलिकच्या मदतीने सलाईनमध्ये कीटकनाशक मिसळून त्यांची हत्या केल्याचा आरोप आहे. अनैतिक संबंध लपविणे आणि सुमारे दोन कोटी रुपयांच्या विमा रकमेवर डोळा ठेवून हा कट रचल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.
प्रकरण संशयास्पद वाटू लागल्यानंतर पोलिसांनी सखोल तपास सुरू केला. बेळगावचे उपविभागीय अधिकारी श्रवणकुमार नायक यांच्या उपस्थितीत तीन महिन्यांपूर्वी पुरण्यात आलेला संदीप मंजरगी यांचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. मृतदेहाचे अवशेष फॉरेन्सिक तपासणीसाठी प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले असून, अहवाल प्राप्त झाल्यानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार असल्याचे श्रवणकुमार नायक यांनी सांगितले.
सुरुवातीला हा मृत्यू अपघाती असल्याचे मानले जात होते. मात्र, पोलिसांच्या तपासातून अनेक धक्कादायक बाबी समोर आल्याचे सांगितले जात आहे. मृत संदीप यांचे बंधू संजय मंजरगी यांनी पोलिसांच्या तपासाचे कौतुक करत, देशसेवा केलेल्या सैनिकाचा विश्वासघात करून हत्या करणाऱ्यांना कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून फॉरेन्सिक अहवालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.








