• चालकाचे नियंत्रण सुटल्याने अपघात

चिक्कोडी : येथील शासकीय विश्रामगृहासमोर सुरू असलेल्या विकासकामादरम्यान सिमेंट-काँक्रीटने भरलेला एक मिक्सर ट्रक चालकाचे नियंत्रण सुटल्याने मुख्य रस्त्यावर उलटल्याची घटना घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, रस्त्याच्या कडेला सुरू असलेल्या गटार बांधकामासाठी काँक्रीट टाकण्याचे काम सुरू असताना अचानक ट्रकचा तोल गेला आणि वाहन रस्त्यावरच उलटले. वजनाने अत्यंत जड असलेले हे वाहन रस्त्याच्या मधोमध आडवे झाल्याने वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण झाला असून पादचारी आणि वाहनधारकांना मार्ग काढताना अडचणींचा सामना करावा लागत आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत करण्यासाठी उपाययोजना सुरू केल्या. अपघातामुळे काही काळ परिसरात वाहतुकीची कोंडी झाली होती.

चिक्कोडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या या अपघातातील ट्रक बाजूला करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून, वाहतूक पूर्ववत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.