• पाच आंतरराज्यीय संशयितांना अटक ; ९.२१ लाखांचा मुद्देमाल जप्त

बेळगाव : हलगा–मच्छे बायपास मार्गावरील जंक्शन परिसरात सुरू असलेल्या गांजा विक्रीच्या रॅकेटचा सीसीबी पोलिसांनी पर्दाफाश करत पाच आंतरराज्यीय संशयितांना अटक केली आहे. या कारवाईत गांजा, कार, दुचाकी, मोबाईल फोन आणि रोख रक्कम असा एकूण ९.२१ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, बेळगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सीसीबीचे पोलीस निरीक्षक मंजुनाथ नायक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मंजुनाथ भजंत्री आणि त्यांच्या पथकाने ही कारवाई केली. गुप्त माहितीच्या आधारे हलगा–मच्छे बायपास जंक्शन परिसरात छापा टाकून गांजाची विक्री करणाऱ्या संशयितांना रंगेहाथ पकडण्यात आले.

अटक करण्यात आलेल्या संशयितांमध्ये नावगे येथील कृष्णा उर्फ राजू रामण्णवर (२७), रणकुंडये येथील प्रमोद पाटील (३४), महाराष्ट्रातील कोल्हापूर येथील रामकृष्ण मावुरकर (३२), मच्छे येथील परशुराम बुगडीकट्टी (२५) आणि खानापूर येथील जानू गवडा (४५) यांचा समावेश आहे.

कारवाईदरम्यान पोलिसांनी १ लाख २० हजार रुपये किमतीचा २ किलो ३३४ ग्रॅम गांजा, गांजा वाहतुकीसाठी वापरण्यात येणारी ७ लाख रुपये किमतीची सुझुकी एक्सएलआर कार, ३० हजार रुपये किमतीची होंडा डिओ दुचाकी, पाच मोबाईल फोन आणि ४६ हजार रुपये रोख रक्कम असा एकूण ९ लाख २१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

या प्रकरणी बेळगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला असून, अंमली पदार्थांच्या पुरवठा साखळीचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे.