• प. पू. डॉ. रमेश महाराज अकोळकर प्रतिष्ठानतर्फे गौरव

बेळगाव : प.पू. कै. डॉ. रमेश महाराज अकोळकर यांच्या १५ व्या पुण्यतिथीनिमित्त श्री दत्त-पंढरी (अकोळ) येथे आयोजित कार्यक्रमात वैद्यकीय क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल डॉ. संजय पंतबाळेकुंद्री यांना “प.पू. सद्गुरु डॉ. रमेश महाराज अकोळकर प्रतिष्ठान” यांचा २०२६ सालचा वैद्यकीय सेवा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

प्रतिष्ठानचे अध्यक्ष अनिकेत महाराज कुलकर्णी यांच्या हस्ते डॉ. पंतबाळेकुंद्री यांना पुरस्कार, सन्मानचिन्ह आणि मानपत्र देऊन गौरविण्यात आले.

पंतबाळेकुंद्री कुटुंबाने गेल्या तीन पिढ्यांपासून अखंडपणे वैद्यकीय सेवा बजावली आहे. महापुराच्या काळात केलेली वैद्यकीय मदत, कोविड महामारीदरम्यान दिलेली विनामूल्य आरोग्यसेवा तसेच आध्यात्मिक, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील सातत्यपूर्ण योगदानाची दखल घेत हा प्रतिष्ठेचा पुरस्कार प्रदान करण्यात आल्याचे आयोजकांनी सांगितले.

यावेळी निपाणी येथील बालरोगतज्ज्ञ डॉ. ईश्वर ढोले यांचाही वैद्यकीय क्षेत्रातील योगदानाबद्दल मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला.

कार्यक्रमात कोल्हापूरच्या प्रसिद्ध गायिका सौ. रमा कुलकर्णी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सादर केलेल्या भक्तिगायनालाही उपस्थितांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. त्यांच्या कलासेवेसाठी त्यांचाही सत्कार करण्यात आला. तसेच श्री दत्त-पंढरी मंदिरातील अविरत सेवा बजावणाऱ्या सेवेकऱ्यांचाही प्रतिष्ठानतर्फे शाल, श्रीफळ देऊन गौरव करण्यात आला.

दुपारी अभिषेक, आरती आणि महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता झाली. या सोहळ्यास पंचक्रोशीसह विविध भागांतील गुरुबंधू आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.