• मल्लेश चौगुले यांचे एनडब्ल्यूकेएसआरटीसी उपाध्यक्षांना निवेदन
  • लवकरच निर्णयाचे आश्वासन

बेळगाव : गणेशपूर आणि महालक्ष्मी लेआउट परिसरात सार्वजनिक वाहतुकीचा अभाव असल्याने नागरिकांना होत असलेल्या गैरसोयीच्या पार्श्वभूमीवर मल्लेश चौगुले आणि स्थानिक नागरिकांनी नैऋत्य कर्नाटक राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एनडब्ल्यूकेएसआरटीसी)चे उपाध्यक्ष सुनील हनुमन्नवर यांची भेट घेऊन बससेवा सुरू करण्याची मागणी केली.

सादर करण्यात आलेल्या निवेदनात पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर गणेशपूर ते बेळगाव सेंट्रल बस टर्मिनस (सीबीटी) दरम्यानची बससेवा पुढील दोन दिवसांत पुन्हा सुरू करावी, तसेच सकाळी ८ ते ११ आणि दुपारी ३ ते सायंकाळी ७ या वेळेत नियमित बसफेऱ्या सुरू कराव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे.

गणेशपूर आणि महालक्ष्मी लेआउट परिसरात सार्वजनिक वाहतुकीची अपुरी सुविधा असल्यामुळे विद्यार्थी, नोकरदार, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना दररोज मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

निवेदन स्वीकारल्यानंतर एनडब्ल्यूकेएसआरटीसीचे उपाध्यक्ष सुनील हनुमन्नवर यांनी गणेशपूरच्या नागरिकांच्या मागणीची दखल घेत, गणेशपूर–महालक्ष्मी लेआउट या मार्गावर नवीन बससेवा सुरू करण्याबाबत लवकरच आढावा घेण्यात येईल, असे सांगितले. आवश्यक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ही बससेवा शक्य तितक्या लवकर सुरू करण्यात येईल, असे आश्वासनही त्यांनी दिले.

ही बससेवा सुरू झाल्यास परिसरातील हजारो नागरिकांना दिलासा मिळणार असून, खाजगी वाहनांवरील अवलंबित्व कमी होऊन दैनंदिन प्रवास अधिक सोयीस्कर होईल, अशी अपेक्षा स्थानिकांनी व्यक्त केली आहे.