बेळगाव : जीवनविद्या मिशनच्या वतीने येत्या ९ ऑगस्ट रोजी गुरुपौर्णिमा महोत्सव आणि कृतज्ञता दिन उत्साहात साजरा करण्यात येणार असून, १० ऑगस्ट रोजी तरुणांसाठी विशेष प्रेरणादायी मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती मिशनचे प्रबोधक शंकरराव बांदेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
रविवार, ९ ऑगस्ट रोजी सकाळी ८ ते दुपारी १.३० या वेळेत बेळगावातील रेल्वे उड्डाणपुलाजवळील मराठा मंदिर हॉल येथे गुरुपौर्णिमा महोत्सव व कृतज्ञता दिनाचा मुख्य कार्यक्रम होणार आहे. या सोहळ्यात सद्गुरू श्री वामनराव पै यांचे सुपुत्र आणि युवा मार्गदर्शक प्रल्हाद वामनराव पै हे प्रमुख प्रबोधक म्हणून उपस्थित राहणार आहेत.
यावेळी शंकरराव बांदेकर यांनी सांगितले की, बेळगावात जीवनविद्या मिशन गेल्या चार दशकांपासून सामाजिक, शैक्षणिक आणि संस्कारवर्धक उपक्रमांद्वारे कार्यरत आहे. सद्गुरूंप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आणि त्यांच्या विचारांचा प्रसार करण्याच्या उद्देशाने या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
त्यानंतर सोमवार, १० ऑगस्ट रोजी मराठा मंडळ पॉलिटेक्निक कॉलेजच्या छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम येथे दोन हजारांहून अधिक विद्यार्थी आणि युवकांसाठी विशेष प्रेरणादायी मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
सद्गुरू वामनराव पै यांनी दिलेला “तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार” आणि “जगातील सर्व लोक सुखी होवोत” हा जीवनदृष्टीचा संदेश समाजापर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने हे कार्यक्रम आयोजित करण्यात आले असून, बेळगावातील नागरिक, विद्यार्थी आणि युवकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले.
पत्रकार परिषदेला जीवनविद्या मिशनचे अध्यक्ष शैलेश शिरोडकर, सचिव सतीश बेकवाडकर आणि खजिनदार दीपक बिरजे उपस्थित होते.








