- “स्वामी, मला एका मुलीपासून वाचवा” अशी अज्ञात भक्ताची प्रार्थना
- रामदुर्गातील घटनेची सोशल मीडियावर चर्चा
रामदुर्ग : बेळगाव जिल्ह्यातील रामदुर्ग तालुक्यातील पदकोट गल्ली येथील श्री राघवेंद्र स्वामी मठाच्या दानपेटीची मोजणी करताना एक अनोखे आणि भावनिक पत्र सापडल्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. एका अज्ञात भक्ताने पत्रातून “स्वामी, मला एका मुलीपासून वाचवा,” अशी आगळीवेगळी प्रार्थना केली असून या पत्राची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे.
सामान्यतः नोकरी, विवाह, आरोग्य, शिक्षण किंवा कौटुंबिक सुखासाठी भक्त देवस्थानातील दानपेटीत आपल्या मनातील भावना व्यक्त करणारी पत्रे टाकतात. मात्र, पाडकोटगल्ली येथील मठात दानपेटीची मोजणी सुरू असताना कर्मचाऱ्यांच्या हाती आलेले हे पत्र सर्वांचेच लक्ष वेधून घेणारे ठरले.
पत्र लिहिणाऱ्या व्यक्तीने आपले नाव आणि पत्ता नमूद केलेला नसून, “स्वामी, मला एका मुलीपासून वाचवा,” एवढीच भावनिक विनंती केली आहे. या अनोख्या पत्रामुळे मठातील कर्मचारी आणि उपस्थित भक्तांमध्ये आश्चर्य व्यक्त करण्यात आले.
दरम्यान, या पत्राचा फोटो आणि त्यातील मजकूर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून, अनेकजण त्यावर विविध प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत. काहींनी याकडे विनोदी दृष्टीने पाहिले असले, तरी काहींनी ही एखाद्या व्यक्तीच्या वैयक्तिक अडचणीची भावनिक अभिव्यक्ती असू शकते, असे मत व्यक्त केले आहे.








