• योग प्रशिक्षक गोपाळराव देशपांडे यांचा विशेष सन्मान

बेळगाव : टिळकवाडी येथील वीर सौध योगा केंद्रातर्फे व्यास पौर्णिमेच्या निमित्ताने गुरूविषयी कृतज्ञता व्यक्त करणारा गुरू वंदन कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाच्या प्रारंभी उषा दळवी यांच्या हस्ते अग्निहोत्र करण्यात आले.

यावेळी योग प्रशिक्षक गोपाळराव देशपांडे यांचा ज्येष्ठ सदस्यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ आणि भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. भारतीय संस्कृतीत गुरूचे स्थान अनन्यसाधारण असून, अज्ञानातून ज्ञानाकडे आणि अंधारातून प्रकाशाकडे नेणारा गुरू जीवनाला योग्य दिशा देतो, अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

योग प्रशिक्षक गोपाळराव देशपांडे यांनी अनेक वर्षांपासून योगाच्या माध्यमातून नागरिकांना निरोगी आणि सुदृढ जीवनशैलीचा संदेश दिला आहे. योग साधकांना नियमित मार्गदर्शन करून आरोग्याबाबत जनजागृती करण्याच्या त्यांच्या योगदानाची दखल घेत वीर सौध योगा केंद्रातर्फे त्यांचा गौरव करण्यात आला.

यावेळी गीता देशपांडे, वाय. पी. नाईक, बीना मुन्नोळकर, स्मिता निंबाळकर, सुलक्षणा जाधव, पल्लवी मदली, विजयालक्ष्मी मायकलवार, प्रा. भूदेवी पुरोहित, जुबेजा आगा, विठाबाई पवार, साताक्का तलवार, सुनीता सोमण, स्वाती पटकुळे, रवींद्र सुतार, उमेश सुपाले, शोभा दुर्वे, गीता कुलकर्णी, वर्षा शानबाग आदींनी गुरूविषयी कृतज्ञता व्यक्त करत मनोगते मांडली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीपा चौगुले यांनी केले, तर दत्तात्रय कुरविनकोप यांनी आभार मानले. उपस्थितांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे गुरू वंदन सोहळा आनंददायी वातावरणात पार पडला.