• पहिल्याच सप्ताहअखेर वर्षा पर्यटनाला वेग ; पर्यटकांची गर्दी अपेक्षित

आंबोली : गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे आंबोलीचा मुख्य धबधबा पूर्ण क्षमतेने प्रवाहित झाला असून, घाटमार्गातील आणि परिसरातील इतर सर्व धबधबेही ओसंडून वाहू लागले आहेत. त्यामुळे आज, ४ जुलैपासून आंबोलीतील वर्षा पर्यटन हंगामाला उत्साहात सुरुवात झाली आहे.

नैसर्गिक सौंदर्य, दाट जंगल आणि समृद्ध जैवविविधतेसाठी प्रसिद्ध असलेल्या आंबोलीत यंदा ६ जून रोजी मान्सूनचे आगमन झाले होते. मात्र, ‘अल निनो’च्या प्रभावामुळे जून महिनाभर पावसाने ओढ दिल्याने धबधबे कोरडेच राहिले होते. त्यामुळे पर्यटनावर अवलंबून असलेल्या स्थानिक व्यावसायिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते.

मात्र, गेल्या चार दिवसांपासून सुरू झालेल्या जोरदार पावसामुळे परिस्थितीत मोठा बदल झाला आहे. मुख्य धबधब्यासह घाटातील सर्व लहान-मोठे धबधबे आता दिमाखात कोसळत असून, संपूर्ण परिसर हिरवाईने नटला आहे.

आजपासून सुरू झालेल्या पहिल्याच सप्ताहअखेर (वीकेंड) मोठ्या संख्येने पर्यटक आंबोलीकडे आकर्षित होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे स्थानिक पर्यटन व्यवसायालाही मोठी चालना मिळणार असून, हॉटेल, निवास व्यवस्था आणि अन्य व्यावसायिकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.