- मलप्रभा नदीच्या पाणीपातळीत लक्षणीय वाढ
- कणकुंबी-जांबोटी परिसरात पावसाचा जोर
खानापूर : तालुक्यातील कणकुंबी आणि जांबोटी परिसरात गेल्या तीन-चार दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मलप्रभा नदीच्या पाणीपातळीत लक्षणीय वाढ झाली आहे. जून महिन्यात पावसाने ओढ दिल्याने चिंतेत असलेल्या शेतकऱ्यांना या पावसामुळे मोठा दिलासा मिळाला आहे.
कणकुंबीच्या दाट जंगल परिसरात सुरू असलेल्या दमदार पावसामुळे नद्या-नाल्यांना पूर आला असून, जंगलातून वाहणारे असंख्य लहान-मोठे प्रवाह आणि धबधबे प्रवाहित झाले आहेत. त्यामुळे संपूर्ण परिसराचे निसर्गसौंदर्य खुलून आले असून, पर्यटक आणि निसर्गप्रेमींना हे मनोहारी दृश्य आकर्षित करत आहे.
शेतकऱ्यांची जीवनवाहिनी मानल्या जाणाऱ्या मलप्रभा नदीच्या उगमस्थानी पावसाचा जोर वाढल्याने नदी आता वेगाने प्रवाहित होत आहे. त्यामुळे नदीकाठच्या शेतकऱ्यांमध्ये आशेचे वातावरण निर्माण झाले असून, खरीप हंगामासाठीही सकारात्मक चित्र दिसू लागले आहे.
आगामी एक-दोन आठवडे असाच पाऊस सुरू राहिल्यास नवीलतीर्थ जलाशयातील पाणीसाठ्यात मोठी वाढ होऊन तो पूर्ण क्षमतेने भरण्यास मदत होईल, असा विश्वास स्थानिक शेतकरी आणि नागरिकांनी व्यक्त केला आहे.








