बेळगाव : पावसाळ्यात शहरात निर्माण होणाऱ्या पाणी तुंबण्याच्या समस्येवर नियंत्रण मिळवण्यासाठी महापालिका प्रशासनाने नालेसफाई मोहिमेला गती दिली आहे. यासाठी तब्बल १ कोटी ५ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली असून दोन ठेकेदारांची नियुक्ती करण्यात आली आहे.
महापालिकेकडून पुढील दोन दिवसांत संबंधित ठेकेदारांना कार्यादेश देण्यात येणार असून त्यानंतर शहरातील नाल्यांची प्रत्यक्ष सफाई तातडीने सुरू होणार आहे. पावसाळा सुरू होण्यापूर्वी सर्व प्रमुख नाल्यांची प्राथमिक सफाई पूर्ण करण्याचे उद्दिष्ट प्रशासनाने ठेवले आहे.
विशेष म्हणजे, पावसाळ्यातही आवश्यकतेनुसार नालेसफाई सुरू ठेवण्याची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे केवळ एकदाच नव्हे तर परिस्थितीनुसार सातत्याने हस्तक्षेप करून पाणी तुंबण्याच्या समस्येवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
महापालिकेच्या बांधकाम स्थायी समितीच्या बैठकीत यापूर्वी नालेसफाईचा मुद्दा चर्चेत आला होता. त्यावेळी अधीक्षक अभियंता लक्ष्मी निपाणीकर यांनी निविदा प्रक्रिया सुरू असल्याची माहिती दिली होती. नियमानुसार प्रक्रिया पूर्ण करूनच ठेकेदार नियुक्त करणे आवश्यक असल्याने अपेक्षेपेक्षा अधिक कालावधी लागल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.
कार्यादेश मिळाल्यानंतर कोनवाळ गल्ली, लेंडी नाला यांसारख्या प्रमुख नाल्यांपासून सफाई मोहिमेला सुरुवात होणार आहे.








