- न्यायालयीन आदेशाचा अवमान केल्याचा आरोप ; शेतकऱ्यांचा तीव्र विरोध
बेळगाव : न्यायालयीन आदेशाचे उल्लंघन करून हालगा – मच्छे बायपास रस्त्याचे काम सुरू ठेवण्यात आल्याच्या आरोपावरून संतप्त शेतकऱ्यांनी पुन्हा एकदा काम बंद पाडल्याची घटना घडली आहे. या प्रकारामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले.
या बायपास रस्त्याच्या कामाला २०१९ पासून स्थानिक शेतकऱ्यांकडून सातत्याने विरोध केला जात आहे. उच्च न्यायालयाच्या मनाई आदेशासह जिल्हा न्यायालयानेही ‘झिरो पॉईंट’ निश्चित होईपर्यंत शेतजमिनींना हात लावू नये, असे स्पष्ट निर्देश दिले होते. मात्र, या आदेशांकडे दुर्लक्ष करून काम सुरू असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.
वर्क ऑर्डरबाबतही शंका उपस्थित करत पोलिसांची भीती दाखवून काम सुरू ठेवण्यात येत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. दोन दिवसांपूर्वी अनगोळ शिवारात आंदोलन करून काम थांबवण्यात आले होते. तरीही मंगळवारी मुसळधार पावसात काम सुरूच ठेवण्यात आल्याने शेतकरी संतप्त झाले.
चिखलामुळे वाहतूक अडथळे निर्माण झाल्याने कच्च्या रस्त्यावर दगड टाकण्याचे काम सुरू होते. हे काम न्यायप्रविष्ट प्रकरणातील शेतकरी हणमंत बाळेकुंद्री यांच्या शेतातही सुरू करण्यात आले. याची माहिती मिळताच त्यांनी पत्नीसमवेत घटनास्थळी धाव घेत ठेकेदाराला जाब विचारला.
यावेळी दोन्ही बाजूंमध्ये जोरदार वाद झाला. “आमच्या शेतातील दगड तात्काळ काढा, अन्यथा रोडरोलरखाली जीव देऊ,” असा इशारा बाळेकुंद्री यांनी दिला. त्यांच्या भूमिकेला उपस्थित शेतकऱ्यांनी पाठिंबा देत काम बंद पाडले.
शेतकऱ्यांचा वाढता विरोध लक्षात घेऊन ठेकेदाराने अखेर नमते घेत जेसीबीच्या साहाय्याने टाकलेले दगड पुन्हा ट्रकमध्ये भरून काम थांबवले. या घटनेनंतर परिसरात तणाव कायम आहे.








