• तंबाखू नियंत्रण कक्षाची शहापूरमध्ये धडक मोहीम
  • शाळा परिसरात तंबाखू विक्रीवर निर्बंध

बेळगाव : सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करणारे तसेच अवैधरित्या तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणाऱ्यांविरोधात जिल्हा तंबाखू नियंत्रण कक्ष आणि पोलीस विभागाने शहापूर परिसरात संयुक्त कारवाई करत ४८ जणांवर दंडात्मक कारवाई केली.

मंगळवारी राबविण्यात आलेल्या या विशेष मोहिमेत ‘कोटपा-२००३’ कायद्यांतर्गत सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करणारे आणि शैक्षणिक संस्थांच्या १०० मीटर परिसरात तंबाखू विक्री करणाऱ्या दुकानदारांवर छापे टाकण्यात आले. या कारवाईत एकूण ४८ गुन्हे नोंदवून संबंधितांकडून दंड वसूल करण्यात आला.

कारवाईदरम्यान नियमांचे उल्लंघन करणाऱ्या दुकानदारांना इशारा देत दंड आकारण्यात आला. तसेच तंबाखू सेवनामुळे कर्करोगासारख्या गंभीर आजारांचा धोका वाढतो, याबाबत जनजागृतीही करण्यात आली.

ही मोहीम जिल्हा अंमलबजावणी अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. यामध्ये राज्य तंबाखू नियंत्रण युनिटचे विभागीय समन्वयक महंतेश उल्लागडी, सामाजिक कार्यकर्त्या कविता राजन्नावर, आरोग्य केंद्राचे सतीश सज्जन आणि पोलीस अधिकारी विठ्ठल बिदारी यांच्यासह पथकातील अन्य सदस्य सहभागी झाले होते.