बेळगाव : बेळगाव लोकसभा मतदारसंघातील केंद्र सरकारच्या विविध विकासकामांचा आढावा खासदार जगदीश शेट्टर यांनी मंगळवारी घेतला. रेल्वे विभाग, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) आणि विमानतळ प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांसमवेत झालेल्या बैठकीत विविध प्रकल्पांच्या प्रगतीचा सविस्तर आढावा घेण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी आणि संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
हलगा-मच्छे बायपास प्रकल्पाबाबत अधिकाऱ्यांनी माहिती देताना ९ किलोमीटरपैकी सुमारे ४ किलोमीटरपर्यंत डांबरीकरण पूर्ण झाल्याचे सांगितले. सेवा रस्त्यांचे काम सुरू असून उर्वरित कामही लवकरच पूर्ण करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले.
बेळगाव-हुनगुंद-रायचूर महामार्गाच्या पॅकेज-१ अंतर्गत ४३.८ किलोमीटरच्या प्रकल्पासाठी सुमारे ३७ किलोमीटर जमीन संपादन पूर्ण झाले असून शेतकऱ्यांना सुमारे २७० कोटी रुपयांची भरपाई देण्यात आल्याची माहिती देण्यात आली. संपूर्ण प्रक्रिया फेब्रुवारी २०२७ पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली.
पॅकेज-२ अंतर्गत ४६.१ किलोमीटरच्या कामासाठी सुमारे ३८ किलोमीटर जमीन संपादन पूर्ण झाले असून शेतकऱ्यांना सुमारे २ कोटी रुपयांची भरपाई देण्यात आली आहे. जमीन संपादन प्रक्रियेत येणाऱ्या काही अडचणी बैठकीत मांडण्यात आल्या.
बैलहोंगल तालुक्यातील नागनूर आणि भाविहाळ गावांतील शेतकऱ्यांच्या मागणीनुसार सेवा रस्ते आणि जनावरांसाठी क्रॉसिंगची सुविधा उपलब्ध करून देण्याच्या सूचना खासदार शेट्टर यांनी NHAI अधिकाऱ्यांना दिल्या.
बेळगाव-संकेश्वर सहापदरीकरणाचे काम अंतिम टप्प्यात असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली. तसेच बेळगाव-कित्तूर-धारवाड नवीन रेल्वे मार्ग प्रकल्पासाठी सुमारे १,१९० एकर जमीन आवश्यक असून त्यापैकी ४०७ एकर संपादनास PAC कडून मंजुरी मिळाल्याचे सांगण्यात आले. मात्र, राज्य सरकारकडून निधी न मिळाल्याने प्रकल्पाच्या गतीवर परिणाम होण्याची शक्यता अधिकाऱ्यांनी व्यक्त केली.
टिळकवाडी येथील एलसी क्रमांक ३८१ जवळ दुसऱ्या मार्गाच्या बांधकामाबाबतही खासदारांनी माहिती घेत काम तातडीने सुरू करण्याच्या सूचना दिल्या.
बेळगाव विमानतळ विस्तार योजनेअंतर्गत समांतर टॅक्सी ट्रॅक उभारण्यासाठी हवाई दलाकडील जमिनीची आवश्यकता असल्याची माहिती विमानतळ अधिकाऱ्यांनी बैठकीत दिली.








