• बाळ शिवाजी, जोतिबा आणि नवदुर्गेच्या वेशभूषेने वाढविली शोभा
  • रांगोळ्या आणि पुष्पवृष्टीने दौडीचे स्वागत

बेळगाव : नवरात्रोत्सवानिमित्त बेळगावात आयोजित श्री दुर्गामाता दौडीच्या सहाव्या दिवशी भक्तांचा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळाला. बाळ शिवाजी, जय भवानी, श्री जोतिबा आणि नवदुर्गेच्या सजीव देखाव्यांनी उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. शहरातील विविध भागांत नागरिकांनी रांगोळ्या काढून, फुलांची उधळण करत आणि आरती ओवाळून दौडीचे स्वागत केले.

शनिवारी सकाळी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चौकात देवी दुर्गेची आरती, प्रेरणा मंत्राचा जप आणि ध्वजारोहण करून दौडीला प्रारंभ झाला. तेथून किर्लोस्कर रोड, रामलिंगखिंड गल्ली, अशोक चौक, बसवण गल्ली, लक्ष्मी मंदिर, गणपत गल्ली, कडोलकर गल्ली, पी. बी. रोड आणि शेट्टी गल्ली या मार्गांवरून दौड पुढे मार्गस्थ झाली. दौडीच्या स्वागतासाठी महिलांनी रात्रभर मेहनत घेऊन आकर्षक रांगोळ्या साकारल्या होत्या. ठिकठिकाणी झालेल्या पुष्पवृष्टीमुळे संपूर्ण परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले.

कामत गल्लीतील रहिवासी आणि महिलांनी मोठ्या उत्साहात दौडीचे स्वागत केले. रस्त्याच्या मध्यभागी छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती प्रतिष्ठापित करून सामूहिक आरती करण्यात आली. दौडीतील बालकांच्या पारंपरिक वेशभूषाही आकर्षण ठरल्या. स्वरा नागेश पवार या चिमुरडीने श्री जोतिबांचा अवतार धारण केला होता, तर दुसऱ्या एका मुलीने देवी लक्ष्मीचे रूप साकारले होते. या देखाव्यांना नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

कामत गल्ली, कसाई गल्ली, सरदार हायस्कूल ग्राउंड रोड आणि कॉलेज रोडमार्गे पुढे गेलेल्या दौडीची मारुती मंदिरात भव्य आरतीने सांगता झाली. दौडीच्या संपूर्ण मार्गावर छत्रपती शिवाजी महाराज आणि देवी दुर्गेच्या जयघोषाने वातावरण दुमदुमून गेले.

दरम्यान, नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने रविवारी शहापूर येथील अंबामाता मंदिरापासून बसवेश्वर सर्कलपर्यंत श्री दुर्गामाता दौड काढण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.