- रोटरी क्लब ऑफ बेळगाव दर्पण आणि बेळगाव टोस्टमास्टर्स सेंटेनरी क्लबचा संयुक्त उपक्रम
बेळगाव : रोटरी क्लब ऑफ बेळगाव दर्पण आणि बेळगाव टोस्टमास्टर्स सेंटेनरी क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने १८ जुलै २०२६ रोजी बेळगावात सार्वजनिक वक्तृत्व कला, प्रभावी संवादकौशल्य आणि नेतृत्व विकासावर आधारित प्रेरणादायी ओपन हाऊस कार्यक्रम उत्साहात पार पडला.
सायंकाळी ४ वाजता सुरू झालेल्या या कार्यक्रमात सहभागी आणि उपस्थित पाहुण्यांना सार्वजनिक वक्तृत्वाची प्रभावी शैली, आत्मविश्वासपूर्ण संवाद आणि नेतृत्वगुण विकसित करण्याविषयी प्रत्यक्ष अनुभव घेण्याची संधी मिळाली. विविध सत्रांमधून उपस्थितांना स्वतःच्या अभिव्यक्तीची ताकद ओळखण्याची आणि प्रभावी संवादाच्या माध्यमातून व्यक्तिमत्त्व विकास साधण्याची प्रेरणा मिळाली.
कार्यक्रमाचे नियोजन आणि यशस्वी आयोजन कार्यक्रम अध्यक्षा रोटेरियन दिव्या एम. यांनी केले. त्यांच्या नियोजनामुळे कार्यक्रम सुरळीत आणि प्रभावीपणे पार पडल्याबद्दल त्यांचे विशेष कौतुक करण्यात आले.
यावेळी रोटेरियन राजनंदा गर्गी, रोटेरियन अनुपमा कळ्ळोळ, रोटेरियन रेणुका मोत्रे आणि रोटेरियन सविता वेसणे यांनी सक्रिय सहभाग नोंदवत कार्यक्रमाच्या यशात मोलाचे योगदान दिले.
आत्मविश्वास, नेतृत्वगुण आणि प्रभावी संवादकौशल्य विकसित करण्यासाठी अशा उपक्रमांचे आयोजन भविष्यातही सातत्याने करण्यात येईल, अशी भावना आयोजकांनी व्यक्त केली.
रोटरी क्लब ऑफ बेळगाव दर्पणच्या अध्यक्षा रोटेरियन डॉ. स्फूर्ती मस्तीहोळी आणि सचिव रोटेरियन ज्योती कुलकर्णी यांनी कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सहकार्य करणाऱ्या सर्वांचे आभार मानले.








