• केपीएससी, केईए घोटाळ्याविरोधात गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी

बेळगाव : विविध सरकारी भरती परीक्षांतील कथित गैरव्यवहार, ओएमआर शीट टॅम्परिंग आणि भ्रष्टाचाराच्या आरोपांविरोधात अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (एबीव्हीपी)च्या कार्यकर्त्यांनी बुधवारी बेळगावातील राणी चन्नम्मा चौकात तीव्र आंदोलन केले. यावेळी राज्य सरकार आणि केईए प्रशासनाविरोधात घोषणाबाजी करत गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली.

सरकारी भरती प्रक्रियेत पारदर्शकतेचा अभाव असल्याचा आरोप करत एबीव्हीपीच्या कार्यकर्त्यांनी राणी चन्नम्मा चौकातून निषेध मोर्चा काढला. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राज्य सरकारला निवेदन सादर करण्यात आले.

प्रसारमाध्यमांशी बोलताना एबीव्हीपीचे प्रमोद पाटील यांनी, केपीएससीमार्फत होणाऱ्या पशुवैद्यकीय अधिकारी भरती प्रक्रियेत ७० ते ८० लाख रुपयांची लाच घेतली जात असल्याचा गंभीर आरोप केला. गुणवंत आणि गरीब विद्यार्थ्यांना डावलून पैशांच्या जोरावर पदे विकली जात असल्याचा दावा त्यांनी केला. तसेच नागरी पोलीस कॉन्स्टेबल (पीसी) परीक्षेतील तांत्रिक त्रुटी आणि प्रश्नपत्रिकांचे क्रमांक बदलल्यामुळे १२९ उमेदवारांवर अन्याय झाल्याचेही त्यांनी सांगितले.

यावेळी रोहित आळकुंटे यांनी जुलैमध्ये जाहीर झालेल्या ४०० पशुवैद्यकीय अधिकारी पदांच्या निकालात मोठा गैरव्यवहार झाल्याचा आरोप केला. तसेच ३ जुलै रोजी झालेल्या पीसी परीक्षेदरम्यान तिकोटी केंद्रावर प्रश्नपत्रिका अर्धा तास उशिरा देण्यात आल्याने उमेदवारांना मानसिक त्रास सहन करावा लागल्याचे त्यांनी नमूद केले.

ओएमआर शीटमध्ये छेडछाड होत असताना सरकारने कोणतीही प्रभावी कारवाई केली नसल्याचा आरोप करत या संपूर्ण प्रकरणाची जबाबदारी स्वीकारून राज्याचे गृहमंत्री आणि केईए अध्यक्षांनी तातडीने राजीनामा द्यावा, अशी मागणी आंदोलकांनी केली.

आंदोलनात एबीव्हीपीचे पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले होते.