• नियमभंग आणि अतिक्रमण करणाऱ्यांना प्रशासनाचा इशारा

बेळगाव : बेळगाव कॅन्टोन्मेंट बोर्डाने परिसर प्लास्टिकमुक्त आणि स्वच्छ ठेवण्यासाठी विशेष स्वच्छता मोहीम सुरू केली आहे. कॅन्टोन्मेंट बोर्डाचे नूतन अध्यक्ष ब्रिगेडियर गिरीश उपाध्याय यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सीईओ सुदाम विजय मंचळकर यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी पहाटेपासून व्यापक स्वच्छता अभियान राबवण्यात आले. यावेळी नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आणि रस्त्यांवर अतिक्रमण करणाऱ्यांना कडक इशाराही देण्यात आला.

ब्रिगेडियर गिरीश उपाध्याय, आमदार आसिफ (राजू) सेठ आणि कॅन्टोन्मेंट बोर्ड सदस्य सुधीर कुप्पेकर यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत या मोहिमेचा निर्णय घेण्यात आला होता.  त्यानुसार सकाळी सहा वाजल्यापासून प्लास्टिक कचरा निर्मूलनासाठी विशेष मोहीम सुरू करण्यात आली.

या मोहिमेत ८४ स्वच्छता कर्मचारी सहभागी झाले असून नाले, गटारी आणि खेळाच्या मैदानांमधून आतापर्यंत सुमारे एक टन प्लास्टिक कचरा हटवण्यात आला आहे. मात्र, बोगरवेस नाल्याजवळ प्लास्टिक पिशव्यांमध्ये टाकलेला वैद्यकीय कचरा तसेच हॉटेलमधील कचरा आढळून आल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे. कॅन्टोन्मेंट परिसरातील काही भागांमध्ये बाहेरील व्यक्तींकडून रस्त्याकडेला बेकायदेशीररीत्या कचरा टाकला जात असल्याचेही निदर्शनास आले.

सीईओ सुदाम विजय मंचळकर यांनी प्लास्टिक कचऱ्यामुळे गटारे तुंबणे, डासांची वाढ होणे तसेच डेंग्यू, मलेरिया आणि चिकुनगुनियासारख्या आजारांचा धोका वाढत असल्याचे सांगितले.

दरम्यान, स्वच्छता मोहिमेदरम्यान काही नागरिकांनी घरांसमोर लोखंडी शेड आणि इतर बांधकामे करून रस्त्यांवर अतिक्रमण केल्याचे उघड झाले. या अतिक्रमणांमुळे अग्निशमन दल, रुग्णवाहिका आणि स्वच्छता वाहनांच्या हालचालींना अडथळा निर्माण होत असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले. अनधिकृत बांधकामे तातडीने हटवावीत, अन्यथा कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा कॅन्टोन्मेंट बोर्डाकडून देण्यात आला आहे. तसेच नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी कचरा न टाकता तो थेट कचरा संकलन वाहनांकडेच द्यावा, असे आवाहनही प्रशासनाने केले आहे.