- एचईआरएफ पथकाची यशस्वी कामगिरी
- अवघ्या दोन तासांत शोधला मृतदेह
बेळगाव : बंबरगा गावाजवळ ओढ्यात पडून मृत्यू झालेल्या व्यक्तीचा मृतदेह अवघ्या दोन तासांत शोधून बाहेर काढण्यात ‘हेल्पलाईन इमर्जन्सी रेस्क्यू फाउंडेशन’ पथकाला यश मिळाले आहे. अत्यंत आव्हानात्मक परिस्थितीत जलद आणि शिस्तबद्ध पद्धतीने राबवलेल्या या शोधमोहीमेमुळे प्रशासनाच्या पुढील कायदेशीर प्रक्रियेला मोठी मदत झाली.
ही घटना आज दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास घडली. करगुप्पी येथील रहिवासी बसवराज मारुती माळगी हे बंबरगा परिसरातील ओढ्यात पडल्याची माहिती पोलिस प्रशासनाला मिळाली होती. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तात्काळ एचईआरएफ पथकाला पाचारण करण्यात आले.
माहिती मिळताच एचईआरएफचे पथक बोटीसह घटनास्थळी दाखल झाले आणि शोधमोहीम सुरू केली. पथकातील बसवराज हिरेमठ, सूरज राक्षे, कार्तिक पाटील आणि प्रकाश पाटील यांनी समन्वय साधत ओढ्यात सखोल शोध घेतला. त्यांच्या अथक प्रयत्नांनंतर अवघ्या दोन तासांत मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात यश आले.








