- प्राण्यांसाठी स्प्रिंकलर व थंड पाण्याची विशेष व्यवस्था
बेळगाव : बेळगावमध्ये यंदा तापमानाचा पारा ४०.१ अंशांवर पोहोचल्याने उन्हाच्या तीव्र झळा बसत असून, याचा परिणाम मानवी जीवनासोबतच प्राणिसंग्रहालयातील वन्यजीवांवरही मोठ्या प्रमाणात जाणवत आहे.

बेळगाव शहर व परिसरात उष्णतेची लाट आल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. वाढत्या तापमानामुळे ताप, डिहायड्रेशन यांसारख्या आरोग्य समस्या वाढत असून वृद्ध, लहान मुले आणि कामगारांचे हाल होत आहेत. त्याचबरोबर या तीव्र उन्हाचा फटका आता मूक प्राण्यांनाही बसू लागला आहे.

शहरालगतच्या भुतरामहट्टी येथील राणी चन्नम्मा प्राणीसंग्रहालयातील वन्यजीव वाढत्या तापमानामुळे अस्वस्थ झाले आहेत. नेहमी सक्रिय असणारे वाघ, सिंह आणि बिबट्यासारखे हिंस्र प्राणी सध्या सावलीचा आधार घेत असून त्यांच्या हालचाली मंदावल्या आहेत. अस्वल आणि तरस यांसारखे प्राणीही उन्हामुळे त्रस्त झाले आहेत.
हरण, काळवीट यांसारख्या तृणभक्षक प्राण्यांच्या खाण्यापिण्याच्या सवयींवरही परिणाम झाला असून हे प्राणी कमी अन्न ग्रहण करताना आणि जास्त वेळ विश्रांती घेताना दिसत आहेत. त्याचबरोबर पाण्याचे सेवन वाढल्याचेही निरीक्षण प्रशासनाने नोंदवले आहे.

या परिस्थितीचा विचार करून प्राणिसंग्रहालय प्रशासनाने ‘समर प्रोटोकॉल’ लागू केला आहे. पिंजऱ्यांमध्ये दिवसभर स्प्रिंकलर यंत्रणा सुरू ठेवण्यात आली असून काही प्राण्यांसाठी बर्फाच्या पाण्याचे स्नान (आईस बाथ) देऊन शरीराचे तापमान नियंत्रित करण्याचा प्रयत्न केला जात आहे.
प्राण्यांच्या आहारातही बदल करण्यात आला असून त्यांना शहाळी, थंड फळे आणि इलेक्ट्रोलाईट्स देण्यात येत आहेत. यामुळे शरीरातील पाण्याचे संतुलन राखण्यास मदत होत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

प्राणिसंग्रहालयातील पशुवैद्यक व कर्मचारी प्राण्यांच्या आरोग्यावर सतत लक्ष ठेवून आहेत. प्रत्येक प्राण्याची दैनंदिन नोंद घेतली जात असून, कोणतीही आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास तातडीने उपचार देण्यासाठी यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे. उष्णतेच्या या तीव्र परिस्थितीत मानवाबरोबरच वन्यजीवांचे संरक्षण करणे हे मोठे आव्हान ठरत असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.








