• पाच अट्टल चोरट्यांना अटक ; ६७ लाखांचा मुद्देमाल जप्त

बेळगाव : शहरात घरफोडी करून दहशत निर्माण करणाऱ्या अट्टल चोरट्यांविरोधात बेळगाव पोलिसांनी मोठी कारवाई करत पाच जणांना अटक केली असून तब्बल ६७ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईमुळे शहरातील ११ घरफोडी प्रकरणांचा उलगडा झाला आहे.

अटक करण्यात आलेल्यांमध्ये रिहान दफेदार, मल्लिक हुबळी, अरमान शेख, खलील हुबळी आणि शाहनवाज पठाण यांचा समावेश आहे.

शहरात आयोजित पत्रकार परिषदेत माहिती देताना पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी सांगितले की, अमन नगर, उज्ज्वल नगर, मारुती नगर, शाहू नगर आणि वीरभद्र नगर परिसरात घरफोडीच्या घटनांमध्ये वाढ झाली होती. या पार्श्वभूमीवर गुन्हे शाखेच्या पोलीस उपायुक्तांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाची स्थापना करण्यात आली होती.

या पथकाने सखोल तपास करत आरोपींकडून ४१५ ग्रॅम सोने तसेच १ किलो ३२९ ग्रॅम वजनाचे इतर दागिने असा एकूण ६७.०९ लाख रुपयांचा ऐवज जप्त केला. या यशस्वी कारवाईमुळे ११ गुन्ह्यांचा उलगडा झाल्याची माहिती आयुक्तांनी दिली.

दरम्यान, शहरातील घरफोडी रोखण्यासाठी पोलिसांनी ‘लॉक हाऊस बीट सिस्टम’ सुरू केली असून, घराला कुलूप लावून बाहेरगावी जाणाऱ्या नागरिकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. आतापर्यंत सुमारे २२० नागरिकांनी या योजनेत नोंदणी केली असून त्यांच्या घरांवर पोलीस विशेष लक्ष ठेवत आहेत.

या तपासात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचे आयुक्तांनी कौतुक करून त्यांना रोख बक्षीस जाहीर केले आहे. नागरिकांनी सतर्क राहून प्रवासापूर्वी पोलिसांना माहिती द्यावी, जेणेकरून मालमत्तेचे संरक्षण अधिक प्रभावीपणे करता येईल, अशी अपेक्षा प्रशासनाने व्यक्त केली आहे.