• वातावरणात निर्माण झाला गारवा

बेळगाव : गेल्या काही दिवसांपासून दडी मारल्यानंतर आज गुरुवारी दुपारी बेळगाव शहर परिसरात वळीव पावसाने हजेरी लावली. त्यामुळे उकाड्याने त्रस्त असलेल्या नागरिकांना दिलासा मिळाला. मात्र अचानक आलेल्या या पावसामुळे शहरातील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे.

हवामान खात्याच्या अंदाजानुसार, गुरुवारी दुपारी बेळगाव शहर नजीकच्या परिसरात मुसळधार पाऊस कोसळला. दुपारपर्यंत अचानक काळे ढग दाटून आले आणि गडगडाटासह झालेल्या पावसामुळे शहरातील मुख्य रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. परिणामी वाहनचालकांसह पादचाऱ्यांना ये-जा करणे अवघड झाले. उन्हाळ्याच्या उकाड्याने हैराण झालेल्या लोकांना पावसामुळे थंडावा मिळाला असला तरी, सखल भागात पाणी शिरल्याने लोकांना तेथून स्थलांतर करण्यास भाग पडले.