- राणी चन्नम्मा सर्कल येथे जोरदार निदर्शने
बेळगाव : चेन्नईतील पत्रकार परिषदेत भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ‘दहशतवादी’ असा उल्लेख केल्याचा आरोप करत भाजप कार्यकर्त्यांनी गुरुवारी बेळगावात तीव्र आंदोलन केले.
शहरातील राणी चन्नम्मा सर्कल येथे एकत्र आलेल्या कार्यकर्त्यांनी खर्गे यांच्या वक्तव्याचा निषेध करत जोरदार घोषणाबाजी केली. पंतप्रधानांविरोधात अशा प्रकारचे अपमानास्पद शब्द वापरणे हे घटनाबाह्य असून राजकीय शिष्टाचाराला धरून नसल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला.
देशाच्या पंतप्रधानांबाबत अशा प्रकारची वक्तव्ये लोकशाहीसाठी घातक असल्याचे सांगत भाजप कार्यकर्त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. पाच राज्यांतील निवडणुकांमध्ये पराभवाच्या भीतीमुळे काँग्रेस नेते अशी वादग्रस्त विधाने करत असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला.
खर्गे यांनी तात्काळ जाहीर माफी मागावी, अशी मागणी आंदोलकांनी केली असून, माफी न मागितल्यास राज्यभरात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे. या आंदोलनात मुरुगेंद्रगौडा पाटील, कृष्णा पाटील, शंकर, आरती यांच्यासह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.








