- १८ केंद्रांवर कडक बंदोबस्त
बेळगाव : राज्यभरात आजपासून सीईटी परीक्षा सुरू झाल्या असून, बेळगावमध्येही परीक्षेला सुरुवात झाली आहे. कर्नाटक परीक्षा प्राधिकरणाने यंदा ड्रेस कोडची कडक अंमलबजावणी करत परीक्षा केंद्रांवर विशेष नजर ठेवली आहे.
जिल्ह्यातील एकूण १८ परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा घेतली जात असून, सुमारे ७,९४२ विद्यार्थी परीक्षेला बसले आहेत. प्रथमच ड्रेस कोड अनिवार्य करण्यात आल्याने केंद्रांच्या प्रवेशद्वारांवर विद्यार्थ्यांची काटेकोर तपासणी करण्यात आली.
विद्यार्थ्यांना अर्ध्या बाह्यांचे शर्ट व साधी पॅन्ट घालण्याचे निर्देश देण्यात आले होते. भरतकाम केलेले कपडे, झिप असलेली पॅन्ट तसेच बूट घालण्यास बंदी घालण्यात आली होती.
शहरातील केएलई लिंगराज कॉलेज, भरतेश, गोमटेश आणि ज्योती पीयू कॉलेजसह प्रमुख केंद्रांवर कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. आज सकाळच्या सत्रात भौतिकशास्त्र, तर दुपारच्या सत्रात जीवशास्त्राचा पेपर होत असून, कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रशासनाकडून दक्षता घेण्यात येत आहे.








