- सॉफ्टवेअर त्रुटी दूर करून मराठी विषयाचा पुन्हा समावेश
बेळगाव : दहावीच्या निकालानंतर मराठी माध्यमातील विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेत मराठी विषयाचा उल्लेख नसल्याने मोठा वाद निर्माण झाला होता. या प्रकारामुळे मराठी भाषिक समाजात तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत होती तसेच विद्यार्थ्यांच्या भवितव्याबाबतही चिंता व्यक्त केली जात होती.
इंग्रजी व इतर माध्यमातील विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेत सर्व विषयांची नावे स्पष्टपणे नमूद असताना, मराठी माध्यमातील विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेत मराठी विषयाचा उल्लेख उल्लेख वगळून केवळ विषयाचा कोड आणि गुण दाखवण्यात आल्याचे समोर आले होते. त्यामुळे हा प्रकार जाणीवपूर्वक झाला आहे का, असा सवालही उपस्थित करण्यात आला होता.
या संदर्भात मराठी माध्यमातील शिक्षक व शाळांच्या मुख्याध्यापकांनी जिल्हा शिक्षण अधिकाऱ्यांकडे तातडीने तक्रार नोंदवली होती. त्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांनी केलेल्या तपासात सॉफ्टवेअरमधील तांत्रिक त्रुटीमुळे हा प्रकार घडल्याचे स्पष्ट झाले. प्रशासनाने तातडीने दखल घेत ही चूक दुरुस्त केली जाईल, असे आश्वासन दिले होते.

त्यानुसार आता सुधारणा प्रक्रिया पूर्ण करण्यात आली असून, नव्याने तपासल्यास मराठी माध्यमातील विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेत मराठी विषयाचा उल्लेख पुन्हा समाविष्ट करण्यात आला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये व पालकांमध्ये निर्माण झालेला संभ्रम दूर झाला असून दिलासा व्यक्त केला जात आहे.
दरम्यान, या घटनेमुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. भविष्यात अशा तांत्रिक चुका टाळण्यासाठी अधिक दक्षता घेण्याची गरज असल्याचे मत शिक्षण क्षेत्रातून व्यक्त होत आहे.








