कागवाड : गेल्या काही दिवसांपासून वाढलेल्या तीव्र उन्हाच्या पार्श्वभूमीवर पोहण्यासाठी तलावात गेलेल्या एका अल्पवयीन मुलीचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना कागवाड तालुक्यातील शेडबाळ गावात घडली आहे. प्रतीक्षा रामू माळी (वय १४ रा. शेडबाळ) असे मृत मुलीचे नाव आहे. ती इयत्ता सातवीत शिकत होती.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, प्रतीक्षा ही तिच्या पाच मैत्रिणींसोबत संजू बागाणे यांच्या मालकीच्या जमिनीत असलेल्या तलावात पोहण्यासाठी गेली होती. यावेळी पोहत असताना अचानक घडलेल्या घटनेत ती पाण्यात बुडाली आणि तिचा मृत्यू झाला.
या घटनेमुळे संपूर्ण गावात शोककळा पसरली असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. मृत मुलीच्या पश्चात तिची आई आणि एक भाऊ असा परिवार आहे. या प्रकरणाची नोंद कागवाड पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.







